मागील २४ तासांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस कोसळला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये हिमाचल प्रदेशात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. अजून २० लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित लोकांना वाचवण्याचं काम सुरू आहे.

राज्यात मुसळधार पाऊस सुरूच असून हिमाचल प्रदेशमध्ये पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये किमान ५० लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली. तसेच शेजारच्या उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले, पूल वाहून गेले, शैक्षणिक संस्था बंद पडल्या आणि नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, सोमवारी भूस्खलन होऊन मुख्य रस्ते ठप्प झाले. अनेक घरं पडली. यामध्ये अजून २० हून अधिक लोक अडकले आहेत, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे राज्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांचे फोन आले. त्यांनी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली.