IIT Mumbai PM Modi Poster Controversy: “दक्षिण आशियाई भांडवलशाही” या विषयावरील कार्यशाळेच्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संशयास्पद चित्रण केल्याबद्दल आयआयटी मुंबईवर सोशल मीडियावरून जोरदार टीका होऊ लागली आहे. अशात आयआयटी मुंबईने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी या कार्यशाळेतून माघार घेतल्याचे सांगितले आहे. आयआयटी मुंबईने ‘एक्स’वर पोस्ट करून या कार्यशाळेशी त्यांचा आता कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्टर १२ सप्टेंबरपासून अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर साउथ एशिया स्टडीज येथे होणाऱ्या “दक्षिण आशियाई भांडवलशाही” या कार्यशाळेचे होते. या कार्यशाळेच्या आयोजकांमध्ये आयआयटी मुंबईचे नाव असल्याने सोशल मीडियावर संस्थेविरोधात टीकेची झोड उठली होती.

यानंतर संस्थेने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगून, ते यापुढे बर्कले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स-अ‍ॅमहर्स्ट विद्यापीठातील संबंधित प्राध्यापकांशी संबंध तोडणार असल्याचे म्हटले आहे.

वादाच्या केंद्रस्थानी असलेले पोस्टर

वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या “भांडवलदार भारताचे पिरॅमिड” या पोस्टरमध्ये, वरच्या रांगेत उद्योगपतींचे व्यंगचित्र दाखवले आहे, ज्यावर “आम्ही तुमच्यावर राज्य करतो” असे विधान आहे. दुसऱ्या रांगेत सत्ताधारी पक्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी साम्य असलेले व्यंगचित्र दाखवले आहे, ज्यावर “आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो” असे विधान आहे.

या पोस्टरच्या तिसऱ्या रांगेत सुरक्षा कर्मचाऱ्यांना दाखवले असून त्यावर “आम्ही तुमच्यावर गोळीबार करतो” असे विधान आहे आणि पिरॅमिडच्या खालच्या दोन थरांमध्ये “आम्ही सर्वांसाठी काम करतो” आणि “आम्ही सर्वांना खायला घालतो” अशी विधाने असलेल्या मध्यमवर्गाचे व मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या कामगारांचे चित्रण आहे.

आयआयटी मुंबईचे स्पष्टीकरण

मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आयआयटी मुंबईने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दक्षिण आशियाई भांडवलशाही कार्यशाळेच्या पोस्टरबाबत एक्सवरील एक पोस्ट संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. ही कार्यशाळा बर्कले विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स-अ‍ॅमहर्स्ट विद्यापीठ यांच्या भागीदारीत तरुण विद्वानांसाठी बर्कले विद्यापीठात आयोजित केली जाणार आहे.”

“या कार्यशाळेत आयआयटी मुंबईचा ‘न्यू पॉलिटिकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह’शी संबंधित एक प्रकल्प आहे. पण, आम्हाला या आक्षेपार्ह पोस्टरबाबत कोणतीही कल्पना नव्हती. ही पोस्ट निदर्शनास आल्यानंतर, आम्ही आयोजकांना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे पोस्टर हटवण्याचे आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्व गोष्टींमधून आयआयटी मुंबईचे नाव काढून टाकण्याचे तात्काळ निर्देश दिले आहेत”, असे आयआयटी मुंबईने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.