Russia On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादलेला आहे. तसेच ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका करताना आणि भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसून येत आहेत. ट्रम्प यांनी लादलेल्या भरमसाठ टॅरिफचा परिणाम भारताला सहन करावा लागत आहे. रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा आणि व्यापार कराराच्या थांबलेल्या वाटाघाटींमुळे भारत आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

असं असतानाच रशियाने भारताच्या भूमिकेचं कौतुक करत अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी शनिवारी तेल व्यापार धोरणांवरील भारताच्या भूमिकेचं कौतुक केलं आणि भारत चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतो, असं म्हटलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

सर्गेई लावरोव काय म्हणाले?

“जयशंकर यांच्याशी नियमित संवादात आम्ही कधीही तेल आणि व्यापाराचा मुद्दा उपस्थित करत नाहीत. भारत या विषयावर स्वतःचे निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम आहे. मी हे देखील विचारत नाही की आमच्या व्यापार संबंधांचं, आमच्या तेलाचं काय होणार? हे मी भारतीय सहकाऱ्यांना विचारत नाही. ते स्वतःहून याबाबतचे निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम आहेत”, असं सर्गेई लावरोव यांनी म्हटलं.

भारतीय परराष्ट्र धोरणाच्या भूमिकेला रशियाचा पाठिंबा

सर्गेई लावरोव यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं. रशियाकडून भारताच्या तेल आयातीबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना सर्गेई लावरोव यांनी म्हटलं की, रशिया भारताच्या राष्ट्रीय हितांचा पूर्णपणे आदर करतो. कोणाकडून काय खरेदी करायचं हे ठरवण्यास भारत पूर्णपणे सक्षम आहे. जर अमेरिकेला भारताला तेल विकायचे असेल तर भारत अटींवर चर्चा करू शकतो. मात्र, तो कोणत्या देशाकडून काय खरेदी करायचं हा त्यांचा सार्वभौम निर्णय आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंधांचा भारत-रशिया भागीदारीशी कोणताही विरोध नाही”, असंही सर्गेई लावरोव यांनी म्हटलं.

दरम्यान, यावेळी सर्गेई लावरोव यांनी भारताच्या स्वाभिमानाचं कौतुक केलं आणि भारताने तेल व्यापार धोरणांवर घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केलं. तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षी डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार असल्याचीही त्यांनी पुष्टी केली.