India-UK Free Trade Deal : जॅग्वार, लँड रोव्हर आणि इतर आलीशान कार आता भारतात स्वस्त होणार आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यात Free Trade Agreement झाल्यानंतर आता भारताने कारवरील आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे आता ब्रिटनमधल्या आलिशान कार भारतात स्वस्त मिळू शकणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युकेचे पंतप्रधान केइर स्टार्मर यांच्यात जो करार झाला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
भारत आणि ब्रिटनमध्ये पार पडला महत्त्वाचा करार
भारत आणि ब्रिटनमध्ये पार पडलेल्या करारानुसार युकेवरुन आयात करण्यात येणाऱ्या या कारवरील आयात शुल्क हे १०० टक्क्यांवरुन १० टक्के करण्यात येईल हे स्पष्ट करण्यात आलं होतं. यानंतर भारताने आयात शुल्क कमी केलंं आहे. भारताने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने या आलीशान कार्सची किंमतही कमी होणार आहे. दरम्यान हे आयात शुल्क किती कार्सवर कमी करायचं याचा एक कोटा ठरवण्यात आला आहे. यामध्ये किती वाहनं असतील हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. JLR द्वारे भारतात ज्या आलिशान गाड्या विकल्या जातात त्यात रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट्स, वेलार या मॉडेल्सचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट काय?
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर एक पोस्ट केली आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातला करार हा दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमधला एक मैलाचा दगड ठरेल. मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांचा फायदा होणार आहे. या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.
कुठल्या ब्रिटिश कार स्वस्त होऊ शकतात?
जॅग्वार, लँड रोव्हर, रोल्स रॉईस, बेंटले, अॅस्टॉन मार्टिन या कार्स स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. यावरचं आयात शुल्क कमी झाल्याने भारतात या कार स्वस्त मिळतील. या आलिशान कार्सकडे अल्ट्रा लक्झरी कार म्हणून पाहिलं जातं. अनेक अब्जाधीशांच्या पसंतीस या कार्स उतरतात त्यामुळे या कार्स विकत घेणारा एक खास वर्ग आहे. आता भारताने जो निर्णय घेतला आहे त्यानंतर या कार आवडणाऱ्या कारप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. आलीशान कार्सवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय भारताने घेतल्याने आता भारतीय बाजारात अधिकाधिक ब्रिटिश कार्स दिसल्यास मुळीच आश्चर्य वाटायला नको. आधीच्या तुलनेत या लक्झरी कार स्वस्त दरांत भारतात मिळू शकणार आहेत.