पीटीआय, नवी दिल्ली
भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकतील अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. त्यावर, आम्ही अंतिम मुदतीचा नाही तर आमच्या सामर्थ्याचा विचार करून करार करू अशी प्रतिक्रिया वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली.
सरकार अंतिम मुदतीचा विचार करून हा करार करणार नाही, तर राष्ट्रीय हिताचा विचार करेल असे वाणिज्यमंत्री गोयल शुक्रवारी म्हणाले. राहुल यांनी ‘एक्स’वर गोयल यांच्या वक्तव्यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करून मोदी यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी ९ जुलै ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. मात्र, आम्ही राष्ट्रहिताचा विचार करूनच करार करतो. काँग्रेस आणि यूपीए राष्ट्रहिताचा विचार करत नव्हते असे प्रत्युत्तर गोयल यांनी राहुल गांधी यांना दिले.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान आपण शस्त्रविराम घडवून आणला असा दावा ट्रम्प यांनी वारंवार केल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी त्याला उत्तर दिलेले नाही. त्याबद्दल काँग्रेस सातत्याने टीका करत आहे.
पीयूष गोयल यांनी कितीही छातीठोकपणे सांगू देत, माझे शब्द लक्षात ठेवा, मोदी ट्रम्प यांनी आखून दिलेल्या मुदतीसमोर लीनपणे झुकतील. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस
आम्ही मुदतीनुसार वाटाघाटी करत नाही. आम्ही राष्ट्रहित लक्षात घेऊन वाटाघाटी करतो आणि जगभरात आमच्या चर्चांमध्ये राष्ट्रहितालाचा सर्वोच्च प्राधान्य असते. – पीयूष गोयल, वाणिज्यमंत्री