US-India Trade Talks : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून ते आजपर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या प्रत्येक निर्णयाची जगभरात चर्चा होते. यातच ट्रम्प यांच्या आयातशुल्क धोरणाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त आयातशुल्क लादलं आहेत. भारत रशियाकडून खजिन तेल खरेदी करत असल्याचं कारण सांगत भारतावरही तब्बल ५० टक्के कराचे (टॅरिफ) ओझं टाकलेलं आहे.

एवढंच नाही तर ट्रम्प यांनी भारताला अनेकदा डिवचण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या दबावाला जुमानलं नाही. यातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी चीनचा दौरा केला आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबत बोलण्याचा सूर बदलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता.

त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी तथा व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत मोठा दावा केला आहे. ‘भारत वाटाघाटीच्या टेबलावर आहे’, असं पीटर नवारो यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळेडोनाल्ड ट्रम्प नरमले का? अशी चर्चा आता रंगली आहे. दरम्यान, पीटर नवारो यांच्या या विधानामुळे भारतावरील टॅरिफ कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार कराराच्या चर्चेसाठी विशेष टीम भारतात दाखल होत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही देशांत उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच अमेरिका आणि भारत व्यापार कराराच्या चर्चेला गती मिळणार असल्याचं बोललं जात आहे. यातच व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनीही भारत वाटाघाटीच्या टेबलावर असल्याचं विधान केल्यामुळे याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

हॉवर्ड लुटनिक यांनीही केला होता मोठा दावा

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी काही काही दिवसापूर्वी भाष्य करत अमेरिका भारताशी व्यापार करार करणार की नाही? याविषयी स्पष्ट भूमिका मांडली होती. हॉवर्ड लुटनिक यांनी पुन्हा एकदा संकेत दिले की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवल्यास भारताबरोबर अमेरिका व्यापार कराराच्या संदर्भाने पुढे जाऊ शकते. “जेव्हा भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल, तेव्हा आम्ही त्यांच्यासोबतच्या सर्व समस्या सोडवू. पण भारताने रशियन तेल आयात बंद करावी, त्यावरच पुढील प्रगती अवलंबून आहे”, असं हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवरून भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या तणावानंतर लुटनिक यांचं हे विधान समोर आलं असून अमेरिका-भारत संबंधांमधील तणाव कमी होण्याची शक्यता मानली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिय मित्र असं संबोधलं होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे देखील नरमले असल्याचं बोललं जात आहे.