इंडिया आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची तयारी चालू आहे. ‘इंडिया’च्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत आघाडीतल्या काही प्रमुख नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी, या प्रस्तावाचे खरगे यांनी पत्रकार परिषदेत थेट खंडनही केलेलं नाही. ‘आधी एकत्र येऊन जिंकू, मग पंतप्रधानपदाचा विचार करू’, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीतल्या काही पक्षांकडून मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला विरोध होत आहे. त्याचबरोबर अनेक पक्ष आपापल्या प्रमुख नेत्याच्या नावाचा उल्लेख करत आहेत. एका बाजूला इंडिया आघाडी नावाच्या एका छताखाली सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला अनेक पक्षांमध्ये मतभेद असल्याने आघाडीत संघर्षदेखील सुरू झाला आहे. त्याचबरोबर पंतप्रधानपदाचा चेहरा कोण होणार हा इंडियासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. जनता दल युनायटेड या पक्षाने इंडिया आघाडीच्या निर्मितीपासून पक्षाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रचार केला आहे.

इंडिया आघाडी तयार करण्यात नितीश कुमार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच पुढाकार घेऊन देशभरातील अनेक पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व पक्षांना एकत्र करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेससारखा मोठा पक्ष यात आल्यानंतर नितीश कुमार हे थोडे बाजूला झाले आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. परंतु, जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दलचे नेते अजूनही नितीश कुमार यांच्यांच नावाचा उल्लेख करत आहेत.

हे ही वाचा >> भारतात मुस्लीम अल्पसंख्याकांचं भवितव्य काय? या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले…

दरम्यान, जदयू आमदार गोपाल मंडल यांनी म्हटलं आहे की, नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत. देशातली जनता मल्लिकार्जुन खरगेंना ओळखत नाही. पत्रकार उल्लेख करू लागल्यानंतर काहीजण खरगेंना ओळखू लागले आहेत. तसेच आत्ता काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव ऐकायला मिळत आहे. परंतु, देशभरातले लोक नितीश कुमार यांना ओळखतात. खरगेंना कोणीच ओळखत नाही. काही ठराविक लोक खरगेंना ओळखतात, सामान्य जनता त्यांना ओळखत नाही. त्यामुळे नितीश कुमारच पंतप्रधान होतील, कारण संपूर्ण देश त्यांना ओळखतो.