झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता काँग्रेसच्या आमदारांचीही चौकशी केली जात आहे. काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांचीही ईडीद्वारे मनी लाँडरिंग प्रकरणी बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. भाजपाचे तिकीट नाकारल्यामुळेच आपली चौकशी होत आहे, असा आरोप अंबा प्रसाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. “भाजपानं मला लोकसभेचं तिकीट देऊ केलं होतं, पण मी त्यासाठी नकार दिला. त्यामुळे माझ्याविरोधात ही कारवाई केली जात आहे”, असा आरोप आमदार अंबा प्रसाद यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छळ

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना आमदार अंबा प्रसाद यांनी गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “भल्या पहाटे ईडीचे अधिकारी माझ्या घरात शिरले. पूर्ण दिवसभर त्यांनी माझा छळ केला. अनेक तास त्यांनी मला एकेठिकाणी उभं ठेवलं. मला भाजपानं हजारीबाग मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देऊ केलं होतं, पण मी ते नाकारलं. त्यानंतर माझ्यावर दबावही टाकम्यात आला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडूनही अनेक लोक येत होते, छत्रा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असेही ते सांगत होते. पण मी त्यावरही काही उत्तर दिले नाही. हजारीबाग मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कदाचित आमच्यावर दबाव टाकला जात असेल. आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जात असावी.”

आमदार अंबा प्रसाद पुढे म्हणाल्या, हजारीबाग लोकसभेतून माझा विजय होईल, अशा बातम्या माध्यमांनी चालविल्या आहेत. त्यामुळेच भाजपाने मला उमेदवारी देऊ केली. ती नाकारल्यानंतरचे परिणाम मी भोगत आहे. मी अदाणींच्या विरोधात कोणताही मुद्दा उचलू नये, अशी समज मला भाजपामधील नेते देत होते. पण मी विषय मांडत राहिले, त्याचे परिणाम म्हणून मला आता या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

ईडीकडून काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या १७ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. हजारीबाग जिल्ह्यातील बरकागाव विधानसभेतील अंबा प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी निगडित ठिकाणांवर या धाडी पडल्या आहेत.

अंबा प्रसाद या झारखंड विधानसभेतील सर्वात तरूण आमदार आहेत. झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साव यांच्या त्या कन्या असून अंबा प्रसाद यांच्या मातोश्री निर्मला देवी यादेखील माजी आमदार आहेत. निर्मला देवी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगतिले की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्या मुलीचे खच्चीकरण करण्यासाठी ईडीकडून तिच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे. मी राजकारण सोडून आता बरेच वर्ष झाले आहेत, माझ्या मुलीलाही मी राजकारण सोडण्याचा सल्ला देईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jharkhand congress mla amba prasad claim after ed raids was offered bjp ticket kvg