कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल देशभरातील राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण देणारे ठरले आहेत. विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपाविरोधात आडाखे आणि डावपेच आखायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडून बैठका सुरू झाल्या असताना तिकडे कर्नाटकात मात्र मुख्यमंत्री कोण होणार? यावर खलबतं सुरू झाली आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस असली, तरी अंतिम निर्णय पक्षाच अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात शिवकुमार वेगळी वाट धरण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असताना खुद्द शिवकुमार यांनी एएनआयशी बोलताना पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. एवढंच नाही, तर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचं लक्ष्य काय असेल, यावरही ते बोलले आहेत.

कर्नाटक झालं, आता लोकसभा लक्ष्य

“लोकसभा निवडणुका हे आमचं पुढचं आव्हान आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत किमान १८ ते २० जागा जिंकायला हव्यात”, असं डी. के. शिवकुमार म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्यासंदर्भात प्रश्न विचारताच त्यांनी त्यावर पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवलं.

Wrestlers Protest: निरीक्षण समितीनं महिला कुस्तीपटूंनाच ऐकवलं; म्हणे, “ब्रिजभूषण सिंह वडिलांसारखे, त्यांचा स्पर्श…!”

“यासंदर्भात पक्ष निर्णय घेईल. मी त्याची काळजी का करू? जर मी पात्र असेन, तर ते मला तशी जबाबदारी देतील”, असं ते म्हणाले.

आमदारांचा पाठिंबा, वेगळा निर्णय घेणार का?

कर्नाटक काँग्रेसमध्ये काही आमदारांचा शिवकुमार यांना पाठिंबा आहे तर काही आमदारांचा सिद्धरामय्या यांना पाठिंबा आहे. आपल्याला पाठिंबा असणाऱ्या आमदारांच्या जोरावर वेगळा निर्णय घेणार का? असा प्रश्न विचारताच शिवकुमार यांनी ती शक्यता साफ फेटाळून लावली.

“मला कोणतेही आमदार फोडायचे नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. आमची संख्या १३५हून जास्त आहे. मला कुठेही फूट पाडायची नाही. आमदार मला पसंत करोत किंवा नाही. पण मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. मला सगळ्यांना एकाच पद्धतीने समानतेनं पाहावं लागतं. काँग्रेस पक्षाची हीच मूलभूत विचारसरणी आहे”, असं ते म्हणाले,

“मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही”

“मी पक्षाच्या मर्यादा का ओलांडू? मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. मी ब्लॅकमेल करणाराही नाही. ज्यांची तशी संस्कृती आहे, त्यांनी तसं करावं. मी तसं का करू? मी तसं करणार नाही. मला चुकीचा इतिहास तयार करायचा नाहीये. जो जन्माला आलाय, त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. मला कोणताही चुकीचा डाग घेऊन जायचं नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.