Kotak Mahindra Bank Branch Manager Rs 31 Crore KYC Fraud: जुगार व सट्टेबाजीच्या आहारी गेलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या एका शाखा व्यवस्थापकाने बिहार सरकारच्या बँक खात्यातील तब्बल ३१ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार केला आहे. अपहार केलेली ही रक्कम या शाखा व्यवस्थापकाने दक्षिण आफ्रिका आणि फिलीपिन्स येथील गेमिंग अॅप्सद्वारे जुगार व सट्टेबाजीसाठी परदेशात पाठवली.
हा प्रकार झाकण्यासाठी व्यवस्थापकाने कोटक महिंद्रा बँकेच्या अनेक ग्राहकांचे आधार व केवायसी तपशील गैरप्रकारे वापरले आणि त्या आधारे २१ बोगस खाती उघडली. या बोगस खात्यांचा वापर तो सट्टेबाजीमधून आलेली बेकायदेशीर रक्कम जमा करण्यासाठी करायचा. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर कोटक महिंद्रा बँकेने आरोपीला कामावरून काढून टाकले. त्यानंतर पोलिसांनी २०२१ मध्ये शाखा व्यवस्थापकाविरुद्ध खटला दाखल केला होता.
“२०२१ मधील ही फसवणूक कोटक महिंद्रा बँकेला अंतर्गत देखरेख प्रणालीद्वारे आढळली. यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला बँकेतून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. बँकेने अहवाल दिल्यामुळे आणि तपास संस्थांना सहकार्य केल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून अपहार केलेल्या निधीचा मोठा भाग वसूल करण्यात आला. आम्ही योग्य कायदेशीर मार्गांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,” असे बँकेने ईकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितले.
“या प्रकरणाच्या तपासात ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित काही दुवे आढळले असले, तरी या व्यवहारांशी बँकेचा काहीही संबंध नाही. कारण हे संपूर्ण प्रकरण माजी कर्मचाऱ्याने फसवणुकीद्वारे मिळवलेल्या निधीच्या वैयक्तिक वापराशी संबंधित होते, ज्यामध्ये बँकेचा कोणत्याही प्रकारे थेट सहभाग नाही. कोटक महिंद्रा बँक मजबूत प्रशासन, ठोस अंमलबजावनी पद्धत आणि ग्राहक संरक्षणाच्या सर्वोच्च मानकांसाठी वचनबद्ध आहे,” अशी प्रतिक्रिया कोटक महिंद्रा बँकेच्या प्रवक्त्यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून तपास केला. यामध्ये असे आढळून आले की, तो परदेशातील संस्थांचा वापर करून चोरीचे पैसे लाँड्रिंग करत असे. यानंतर ईडीने याची माहिती २०२५ मध्ये बिहार पोलिसांना दिली. त्यानंतर २७ जून २०२५ रोजी बिहार पोलिसांनी या व्यवस्थापकावर दुसरा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाबाबत बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे डीआयजी मानवजीत सिंग ढिल्लन यांनी ईटी वेल्थ ऑनलाइनला सांगितले की, “या शाखा व्यवस्थापकाने चेक क्लोनिंग फसवणुकीचा वापर केला. त्याने बिहार सरकारच्या जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नावाने जारी केलेल्या चेकवर बनावट स्वाक्षरी केली आणि तो वटवला. चेकवरील स्वाक्षरी नमुना स्वाक्षरीशी जुळते की नाही, हे ठरवण्यासाठी शाखा व्यवस्थापक हा सर्वोच्च अधिकारी असल्याने, ही फसवणूक पकडणे कठीण झाले. त्याने सुमारे दोन वर्षे हा गैरप्रकार केला आणि सुमारे ३१.९३ कोटी रुपये लुबाडले. पुढे हे लुबाडलेले पैसे त्याने ज्या बेटिंग/जुगार अॅप्समध्ये गुंतवले, त्यावर भारतात बंदी आहे.”