Maha Kumbh Is Faltu Lalu Prasad Yadav: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (शनिवारी) रात्री चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. याचबरोबर या दुर्दैवी घटनेबाबत संतापही व्यक्त होत आहे. अशात माजी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी, रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत बोलतना लालू प्रसाद यादव म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रेल्वेच्या या गैरव्यवस्थापनामुळे इतक्या लोकांचे जीव गेले. रेल्वेमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.” यावेळी लालू प्रसाद यांना महाकुंभमेळ्यासाठी गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत विचारले असता ते म्हणाले, “कुंभला काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे.” याबाबद एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

शनिवारी रात्री दहाच्या दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर भाविकांची धावपळ सुरू झाली आणि चेंगराचेंगरीमागे हेच कारण असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर आता या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

राहुल गांधींची रेल्वे प्रशासन आणि सरकारवर टीका

दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्यापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाकुंभमेळ्याला प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे स्थनकांवर योग्य व्यवस्था केली नसल्याची टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून सहानुभूति व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. सरकार आणि प्रशासनाने गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी घ्यावी.”

मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी रविवारी सांगितले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी आणि घटनेमागील कारणे शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच वेळी, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन घटनेतील पीडित आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu yadav kumbh faaltu new delhi stampede aam