Mallikarjun Kharge on Narendra Modi Foreign Policy : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पर्यटकांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरलं, तसेच या हल्ल्याबाबत व दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळवण्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. तसेच हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शोधण्यातही यश आलेलं नाही. यावरून विरोधक केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “सरकारने पर्यटन स्थळी सुरक्षा पुरवली असती तर इतक्या लोकांचा बळी गेला नसता”. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींवरही आरोप केला आहे. ते म्हणाले, “संरक्षण यंत्रणांनी मोदींना काश्मीरला जाऊ नका असं सांगितल्यामुळे ते काश्मीरला गेले नाहीत”.
…तर पर्यटक वाचले असते : खर्गे
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, “संरक्षण यंत्रणांनी धोक्याची सूचना दिली म्हणून मोदी स्वतः काश्मीरला गेले नाहीत. मग त्यांनी पर्यटकांनाही तिथे जाण्यापासून रोखायला हवं होतं. तुम्ही तसं केलं असतं तरी २६ लोकांचे प्राण गेले नसते. तसेच भारत-पाकिस्तानमधील छोटंसं युद्ध देखील झालं नसतं”.
परराष्ट्र धोरणावरून खर्गेंची टीका
मल्लिकार्जुन खर्गे यांनी परराष्ट्र धोरणावरून मोदी सरकाला धारेवर धरलं आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने परदेश दौरे करत आहेत. परंतु, आता भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे, भारताला आंतरराष्ट्रीय समर्थनाची आवश्यकता आहे. मात्र, कुठलाही देश आपल्याबरोबर उभा राहिलेला नाही. मोदींनी गेल्या ११ वर्षांत १५१ परदेश दौरे केले. त्यांनी ७२ देशांना भेटी दिल्या. त्यांनी एकट्या अमेरिकेचा १० वेळा दौरा केला. तरीदेखील अमेरिकेसह कुठलाही देश आपल्या समर्थनासाठी पुढे आलेला नाही. हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. मोदी या १५१ दौऱ्यावंर केवळ फोटो काढून घ्यायला गेले होते का?”
मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी मंडळाने दोन आठवड्यांपूर्वी (९ मे) पाकिस्तानला १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ८,५०० कोटी रुपये तात्काळ वितरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. भारताने त्यास विरोध केला होता. मात्र, त्यावेळी देखील कुठलाच देश भारताबरोबर उभा राहिला नाही. उलट दहशतवाद्यांविरोधात, त्यांना बळ देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराविरोधात आपले शूर सैनिक सशस्त्र लढा देत होते, तेव्हा अचानक मोदींनी युद्धविरामाची घोषणा केली.