Piyush Goyal : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ समोर आला आहे. पीयूष गोयल हे न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होण्यासाठी विमानतळावर विमानाची प्रतिक्षा करत थांबले होते. मात्र, विमानाला आणखी वेळ असल्याने पीयूष गोयल हे विमानतळावरच बसून आपलं काम पूर्ण करत फाईलींवर सह्या करत असल्याचे पाहायला मिळाले आहेत.

प्रवास करत असताना विमानतळावर मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत काम पूर्ण करत असताना एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ काढला आणि त्यांना काही प्रश्न देखील विचारले. त्यावर उत्तर देताना पीयूष गोयल यांनी म्हटलं की, ‘आपण वेळ का वाया घालवायचा? माझ्या विमानाला आणखी थोडा वेळ आहे. त्यामुळे थोड्यावेळ काम करत बसलो आहे”, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल काय म्हणाले?

“गेल्या २० वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये एफटीएसाठी (मुक्त व्यापार करार) चर्चा सुरू आहे. मात्र, काही कारणास्तव ती चर्चा पूर्ण होत नाहीये. आता पंतप्रधान मोदींनी सर्वांसमोर विकसित भारत २०४७ चं लक्ष्य ठेवलं आहे. त्यासाठी विकसित देशांबरोबर आपले संबंध आणखी वाढवणे, भारताचा व्यापार वाढणे, भारतात गुंतवणूक वाढवणे, आपल्या लोकांना बाहेरील संधी मिळवून देणे, रोजगार निर्माण करणे, या सर्व गोष्टी आवश्यक आहेत”, असंही गोयल यांनी यावेळी म्हटलं.

“गेल्या ६ महिन्यांपासून न्यूझीलंड आणि भारत यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशांत एफटीए करार होण्याची शक्यता आहे. मला आशा आहे की आपण लवकरच दोन्ही देशांमध्ये एफटीएवर निर्णय घेऊ आणि हा निर्णय दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल”, असंही मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं.