शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत काम न केल्याच्या आणि सरकार असूनही कामे होत नसल्याच्या तक्रारींचा पाढाच वाचला. या तक्रारींसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील, असे शिंदे यांनी या आमदारांना सांगितले.

लोकसभा निवडणूक निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिंदे यांनी शिवसेना आमदार व खासदारांच्या बैठकीचे आयोजन ‘वर्षा’ निवासस्थानी केले होते. आमदारांच्या बैठकीला तीन आमदार गैरहजर होते. त्यापैकी शहाजी पाटील रुग्णालयात दाखल असून अन्य दोघांनी शिंदे यांना अनुपस्थितीबाबत आधीच कळविले होते.

हेही वाचा >>> रक्षा खडसे : सरपंचपदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत झेप

शिंदे यांच्यापुढे प्रत्येक आमदाराने आपली भूमिका, निवडणुकीतील अडचणी आणि मतदारसंघांतील प्रश्न मांडले. लोकसभा निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी काही ठिकाणी काम केले नाही किंवा त्यांच्यामुळे कोणत्या अडचणी आल्या याबाबत तक्रारी केल्या. आमदारांच्या कामांसाठी निधी मिळणे, प्रश्नांवर मंत्र्यांकडून निर्णय घेण्यास होणारा विलंब आणि अडचणीही मांडल्या. ही बैठक सुमारे अडीच तास चालली. त्यात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर तातडीने लक्ष देऊन प्रश्न सोडविण्याचे आणि प्रत्येक आमदाराशी मतदारसंघनिहाय चर्चा करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

खासदारांचीही बैठक

आमदारांची बैठक रात्री दहाच्या सुमारास आटोपल्यावर शिंदे यांनी खासदारांचीही बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी कसे काम केले, याविषयी त्यांनी भूमिका मांडली.