Shashi Tharoor : केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. संसदीय स्थायी समित्यांच्या कार्यकाळात वाढ करण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माहितीनुसार, संसदीय स्थायी समित्यांचा कार्यकाळ चालू एक वर्षांवरून दोन वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. या निर्णयाचा लाभ काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर यांनाही होणार आहे.

संसदीय स्थायी समित्यांचा कार्यकाळ दोन वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून या निर्णयामागचं उद्दिष्ट हे विधेयके, अहवाल आणि धोरणात्मक बाबींची सखोल तपासणी करण्यासही आदी आहे. सध्याच्या समित्यांचा कार्यकाळ हा संपत असल्याने सरकार लवकरात लवकर हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासाठी सरकारच्या या निर्णयाचं विशेष राजकीय महत्त्व आहे. कारण शशी थरूर हे सध्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष आहेत. सरकारने जर संसदीय स्थायी समित्यांचा कार्यकाळ दोन वर्षांपर्यंत वाढवला तर या निर्णयाचा फायदा शशी थरूर यांना होणार असून त्यांचा परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदाचा दर्जा अबाधित राहू शकतो.

संसदीय स्थायी समित्यांचं काम काय असतं?

संसदीय स्थायी समित्या ही लोकसभा आणि राज्यसभेतील निश्चित संख्येने खासदार असलेली स्थायी संस्था असते. या माध्यमातून प्रस्तावित कायद्यांचं परीक्षण, सरकारी धोरणांचा आढावा, अर्थसंकल्पीय वाटपांची छाननीसह आदी महत्वाच्या निर्णयांत या समित्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

दरम्यान, या समित्यांची दरवर्षी पुनर्रचना केली जाते. आता विरोधी पक्षाच्या सदस्यांसह अनेक खासदारांनी सरकारला त्यांचा कार्यकाळ किमान दोन वर्षांपर्यंत वाढवण्याची विनंती केली केली आहे. कारण नियुक्त केलेल्या विषयांबाबत व्यापक आणि सखोल अभ्यास करण्यासाठी एक वर्ष पुरेसं नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं आहे. त्यामुळे या समिती अध्यक्षांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, नवनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ दुप्पट केला जाऊ शकतो. ज्यामुळे समित्यांना अधिक सातत्यपूर्ण काम करता येईल आणि कायदेविषयक व धोरणात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करता येईल.