नवी दिल्ली : सनातन धर्मावरून तीव्र झालेल्या वादावर, ‘योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज आहे’, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत मांडले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनचे पुत्र उदयनिधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पहिल्यांदाच मोदींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेवरील ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ या नामोल्लेखानंतर उद्भवलेल्या ‘इंडिया विरुद्ध भारत’ वादावर भाजप नेत्यांनी तसेच मंत्र्यांनी संयम बाळगण्याची सूचनाही मोदींनी बैठकीत केली. या विषयावर सरकारच्या वतीने अधिकृत व्यक्ती प्रतिक्रिया देईल त्यामुळे इतरांनी बोलण्याची गरज नाही. विनाकारण इतिहासाचे दाखले देऊ नका. संविधानामधील तथ्यांच्या आधारे बाजू मांडा. सद्य:स्थितीसंदर्भात या विषयावर प्रत्युत्तर द्या, असा सल्लाही मोदींनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिला.

हेही वाचा >>>G20 Summit in India: प्रतिनिधींना सोन्या-चांदीच्या भांड्यात वाढलं जाणार जेवण, पाहा VIDEO

उदयनिधी स्टॅलिन यांनी तमिळनाडूमधील जाहीर कार्यक्रमात सनातन धर्मावर तीव्र टीका केली होती. सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे, असे वादग्रस्त विधान उदयनिधी यांनी केले होते. या विधानामुळे देशभर वादंग माजला असून भाजपच्या नेत्यांनी द्रमुकसह विरोधकांच्या महाआघाडीतील घटक पक्षांवर टीका केली.

हेही वाचा >>>उदयनिधींच्या ‘सनातन धर्मा’वरील वक्तव्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी, सर्व मंत्र्यांना म्हणाले…

या वादामुळे काँग्रेससह इतर पक्षही अडचणीत आले आहेत. काँग्रेस पक्षामध्येही या मुद्दय़ावरून मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या वादावर जाहीर वक्तव्य केले नसले तरी, त्यांचे पुत्र व कर्नाटकमधील मंत्री प्रयंक खरगे, लोकसभेतील खासदार कार्ती चिदम्बरम, मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ आदी नेत्यांनी उदयनिधी यांना पाठिंबा दिला आहे. इंडियातील घटक पक्ष भाकपचे नेते डी. राजा यांनीही उदयनिधींच्या विधानाचे समर्थन केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi statement that there is a need to give a proper reply in the sanatan dharma controversy amy