केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या धोरणांवर सातत्याने विरोधकांकडून टीका केली जाते. मध्यंतरी सामाजिक ऐक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही विधानं वा कृती भाजपा नेत्यांकडून होत असल्याचा देखील आरोप केला गेला. या पार्श्वभूमीवर देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच, सांगलीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी कर्नाटकमधील काही समाजघटकांनी अल्पसंख्याकांच्या दुकानातून खरेदी न करण्याच्या केलेल्या आवाहनावर देखील टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“धर्मांध वृत्तीविरोधात लढा द्यावा लागेल”

“कर्नाटकात भाजपाचं राज्य आहे. तिथे अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका असा फतवा काही संघटनांनी काढला आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो. व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. पण तो अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्याचा मालच घेऊन नका, अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसं ठेवायचं? हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे या धर्मांध वृत्तींच्या विरोधात देखील आपल्याला लढाई द्यायची आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची टोलेबाजी; म्हणाले, “मुंबईत जेव्हा दोन मराठी माणसं भेटतात..”!

“धर्माच्या नावाने माणसांमध्ये अंतर”

देशात सध्या धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये अंतर निर्माण केलं जात असल्याची नाराजी शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवली. “आज देशातलं राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. राष्ट्र एका वेगळ्या लोकांच्या हातात आहे. महाराष्ट्रातही अनेक कर्तृत्ववान माणसं होऊन गेली. त्यांनी हा देश उभा केला. विकासाचं राजकारण केलं. माणसं जोडण्याचं राजकारण केलं. पण आज देशामध्ये धर्माच्या नावाने माणसांमध्ये अंतर निर्माण केलं जात आहे”, असं पवार म्हणाले.

“मला मोदींना ठार मारायचं आहे, त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय”, मुंबई NIA ला आला धमकीचा मेल! तपास सुरू

“देशासाठी जे खपले, त्यांचा सन्मान करण्याऐवजी..”

“महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही त्या काळातली नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट केले. त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिलं. देशासाठी जे खपले, त्यांच्याबद्दलचा आदर, सन्मान ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणं, यातच धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवानं आपल्याला देशात पाहायला मिळतंय. त्यामुळे लोकांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे”, अशा शब्दांत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar slams pm narendra modi on religion based politics in india pmw