नवी दिल्ली : Karnataka Election NCP Party contest elections राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमिताने महाराष्ट्राशेजारील राज्यांमध्ये उमेदवार उभे करून पुन्हा पक्षविस्तार केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती उमेदवार रिंगणात उभे केले जातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

कर्नाटकमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे जागा लढवणार असला तरी मराठी भाषकांच्या हिताला महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असे पवार म्हणाले. कर्नाटकमध्ये २२४ मतदारसंघ असून काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभे करेल. मात्र, सीमाभागांतील मराठी भाषकांसाठी आपसांतील मतभेद हितावह ठरणार नाहीत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देऊ, असेही पवार यांनी सांगितले.

हितसंबंधांतील विसंगती : कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अशी तिहेरी लढत होणार आहे. सत्ताधारी भाजपच्या घोटाळय़ांमुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. पण राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या ऐक्यात सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये निवडणूक लढवेल. त्यामुळे काही जागांवर काँग्रेस आणि भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारही रिंगणात असेल. त्यानिमित्ताने राज्या-राज्यांतील विरोधी पक्षांच्या हितसंबंधांतील विसंगती समोर आली आहे.