Nitin Gadkari responded Donald Trump Threats: गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. याचबरोबर या निर्णयावर बऱ्या वाईट प्रतिक्रियाही येत आहेत. अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
नितीन गडकरी यांनी नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर थेट टीका केली आणि म्हटले की, “जे दादागिरी करत आहेत, ते आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, म्हणून ते असे करत आहेत.”
नागपूरमधील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्याख्यान देताना गडकरी म्हणाले की, “जर आपला निर्यात आणि आर्थिक विकास दर वाढला, तर आपल्याला कोणाकडेही जाण्याची गरज भासेल असे मला वाटत नाही. जे दादागिरी करत आहेत, ते आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, म्हणून ते असे करत आहेत.”
“जर आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत झालो आणि तंत्रज्ञानातही प्रगती केली, तरी आपण कोणालाही धमकावणार नाही, कारण हे आपल्या संस्कृतीत नाही. आपली संस्कृती आपल्याला शिकवते की जगाचे कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे”, असे ते पुढे म्हणाले.
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी नवोपक्रमाचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले, “आज जगातील सर्व समस्यांवर विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञान हाच उपाय आहे. जर आपण या तीन गोष्टींचा वापर केला, तर आपल्याला कधीही जगासमोर झुकावे लागणार नाही. संशोधन केंद्रे, आयआयटी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन केले पाहिजे. सर्व जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला सर्वांना हे लक्षात ठेवून काम करावे लागेल. जर आपण असे काम सतत केले, तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर तिप्पट होईल.”
ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव वाढला आहे. त्यानंतर नितीन गडकरींची ही प्रतिक्रिया आली आहे. यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या टॅरिफ वाढीचा फटका कापड आणि रत्नांपासून ते औषधनिर्माण आणि ऑटो पार्ट्सपर्यंत विविध क्षेत्रांना बसणार आहे.