नवी दिल्ली : ‘ऑपेरशन सिंदूर’ शौर्याचे प्रतिक असून ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली. कोणत्याही दबावाखाली शस्त्रसंधी केलेला नाही. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे उद्दिष्ट गाठल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. ही कारवाई संपली नसून पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी हल्ला केला, तर ती पुन्हा सुरू केली जाईल असेही ते म्हणाले.
पहलगाममध्ये सुरक्षा यंत्रणा व गुप्तचर यंत्रणांचे अपयश, ऑपरेशन सिंदूरमध्ये एकतर्फी शस्त्रसंधी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा अशा अनेक वादग्रस्त प्रश्नांवर विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी केली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गोंधळात वाया गेल्यानंतर अखेर सोमवारी दुपारी दोन वाजता या मुद्द्यांवर लोकसभेत चर्चा सुरू झाली. चर्चेला सुरुवात करताना सिंह यांनी लष्करी कारवाईची माहिती दिली. पाकिस्तानविरोधात युद्ध करणे हा ‘ऑपरेशन सिंदूर’चा हेतू नव्हता. २२ मिनिटांमध्ये उद्दिष्ट साध्य केले गेले, असे ते म्हणाले.
पाकिस्तानने सुरुवातीला दहशतवादी तळ नष्ट केल्याचा मान्य केले नाही. उलट भारताच्या नागरी आणि लष्करी तळांवर हल्ले करून त्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. मात्र त्यांच्या या हल्ल्यांमुळे भारताचे कोणतेही नुकसान झालेले नाही. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
राहुल गांधींना प्रत्युत्तर
‘ऑपरेशन सिंदूर’ का थांबवले, असा प्रश्न करत लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केला. त्यावर, कारवाई का थांबवली याचे उत्तर मी माझ्या भाषणात आधी दिलेले आहे. राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण, त्यांनी माझे भाषण पूर्णपणे ऐकावे त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता राहणार नाही, असे सांगत सिंह यांनी राहुल गांधींना गप्प केले.