Pakistan actress Humaira Asghar Ali Death Mystery : पाकिस्तानी अभिनेत्री हुमायरा असगर अली हिच्या मृत्यूच्या बातमीने खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूप्रकरणाबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असून हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं असल्याचं दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार नऊ महिन्यांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. डिजीटल पुरावे व फॉरेन्सिक अहवालानंतर तपास पथकाने ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिचा मृत्यू झाला असल्याचं फॉरेन्सिक पथकाने सांगितलं आहे.
हुमायराच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित अहवालांचा दाखला देत तपास अधिकाऱ्यांनी अरब न्यूजला वरील माहिती दिली आहे. हुमायरा असगरचा मृतदेह कराची येथील तिच्या राहत्या घरात आढळला होता. ‘तमाशा घर’ फेम हुमायराने अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलं होतं. ती ३२ वर्षांची होती. हुमायराचा मृतदेह घरातच कुजला होता. हुमायरा भाड्याच्या घरात राहत होती. घराच्या मालकाने भाडं न मिळाल्यामुळे पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. पोलिसांना घरात कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.
हुमायराच्या पालकांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
हुमायराच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, हुमायराचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या वडिलांना व भावाला याबाबतची माहिती देण्यात आली, मात्र त्यांनी तिचा मृतदेह घेण्यास नकार दिला. पोलिसांनी तिच्या भावाला फोन केला होता. त्यावर त्याने त्याच्या वडिलांशी बोलायला सांगितलं. हुमायराचे वडील असगर अली हे लष्करातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत. ते म्हणाले, “आम्ही तिच्याबरोबरचे सगळे संबंध आधीच तोडले आहेत, त्यामुळे तुम्हाला तिच्या मृतदेहाचं वाट्टेल ते करा. आम्ही तो स्वीकारणार नाही.”
हुमायरा असगरचा मृतदेह गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून अपार्टमेंटमध्ये पडून होता. कोणालाच तिच्या मृत्यूबद्दल माहीत नव्हतं. घरभाड्याच्या थकबाकी संदर्भातील कोर्टाचे आदेश घेऊन ८ जुलै रोजी पोलीस तिच्या घरी पोहोचले, मात्र कोणीही घराचं दार उघडलं नाही. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आत त्यांना तिचा कुजलेला मृतदेह आढळला. हुमायराने जवळपास वर्षभरापासून घराचं भाडं भरलं नव्हतं.