Pakistan Army Shot Dead 8 Protesters In POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनादरम्यान, पाकिस्तानी लष्कराने ८ नागरिकांवर गोळ्या झाडल्या आहेत. त्यामध्ये या सर्वांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बाग जिल्ह्यातील धीरकोटमधील चार, मुझफ्फराबादमधील दोन आणि मीरपूरमधील दोघांचा समावेश आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. तत्पूर्वी मंगळवारीही मुझफ्फराबादमध्ये इतर दोन आंदोलकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १० झाली आहे.
मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात अवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या ७२ तासांत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली आहेत, ज्यात बाजारपेठा, दुकाने आणि स्थानिक व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत, तसेच वाहतूक सेवाही थांबवण्यात आल्या आहेत.
या प्रांतात पीठ, नियमित आणि अनुदानित वीज पुरवठ्यासाठी दोन वर्षांपूर्वी आंदोलने सुरू झाली होती परंतु आता त्यात काश्मिरी उच्चभ्रूंचे विशेषाधिकार कमी करणे, राखीव विधानसभेच्या जागा रद्द करणे आणि मोफत शिक्षण व आरोग्य सेवा यासारख्या अतिरिक्त मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या कराराची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे ही आंदोलने करण्यात येत असल्याचा आरोप जेकेजेएएसीने केला आहे. निदर्शकांनी ३८ कलमी मागण्या सादर केल्या आहेत, त्यातील मुख्य मागण्यांमध्ये निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ जागा रद्द करणे आणि उच्चभ्रूंचे विशेषाधिकार रद्द करणे यांचा समावेश आहे.
अलिकडेच एएसी, पाकिस्तान सरकारचे मंत्री आणि पीओके प्रशासन यांच्यातील वाटाघाटी रद्द झाल्यानंतर ही अशांतता निर्माण झाली आहे. या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून, पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतातून पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैन्य पाठवले आहे. याचबरोबर इस्लामाबादहूनही अतिरिक्त १,००० सैन्य पाठवण्यात आले आहे. याचबरोबर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.