Pakistan Fake News: पाकिस्तानी सैन्याचा कणा मोडणाऱ्या भारताच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तान मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या काळात पाकिस्तानने केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. अशात आता पाकिस्तानचा आणखी एक दावा खोटा ठरला आहे. ज्यामध्ये त्यांनी भारताच्या आदमपूर हवाई तळावर सुखोई-३० एमकेआयवर हल्ला करून त्याचे नुकसान केल्याचे म्हटले होते.
पाकिस्तान या दाव्याच्या समर्थनार्थ एक खोटे उपग्रह छायाचित्रही प्रसारित करत होता, ज्यामध्ये एका जेटचा काही भाग जळाल्याचे दिसत आहे. पण याबाबत फॅक्ट-चेक केल्यानंतर, पाकिस्तान प्रसारित करत असलेले हे छायाचित्र भारत-पाकिस्तान संघर्षापूर्वीच्या सुमारे एक महिना आधीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छायाचित्र विश्लेषक डेमियन सायमन यांनी पाकिस्तानचा, त्यांनी भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानाचे नुकसान केल्याचा दावा खोडून काढला आहे. पाकिस्तान प्रसारित करत असलेले छायाचित्र प्रत्यक्षात मार्चमध्ये देखभाल सुरू असलेल्या मिग-२९ चे आहे, असे डेमियन सायमन यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून खोटे दावे
“एका नव्या अहवालात पाकिस्तानने भारताच्या आदमपूर हवाई तळावर थेट हल्ला केल्याचा दावा आहे. परंतु मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या या छायाचित्रावरून असे दिसून आले आहे की, हे छायाचित्र भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षापूर्वीचे आहे. या छायाचित्रात मिग-२९ च्या देखभालीचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. इंजिन टेस्ट पॅडजवळील काळी काजळी ही कायमच असते, हे युद्धातील नुकसान नाही,” असे डेमियन सायमन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
डेमियन सायमन यांचे विश्लेषण
यापूर्वी, ६ जून रोजी डेमियन सायमन यांनी एका छायाचित्रासह शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “पाकिस्तानने भारतात ए-४०० रडार नष्ट केल्याचा एक फोटो सध्या प्रसारित होत आहे. पण, विश्लेषनानंतर असे दिसून आले आहे की, ते कदाचित भूज लष्करी तळाच्या वाहन सेवा यार्डवरील तेलाचे डाग आहेत, तसेच हे छायाचित्र भारत-पाकिस्तान संघार्षापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेले आहे.”
पंतप्रधानांची आदमपूर हवाई तळाला भेट
उल्लेखनीय म्हणजे, भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळाला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता.
ऑपरेशन सिंदूर
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते.