Pakistan Nuclear Test : चीन, पाकिस्तान, रशिया आणि उत्तर कोरिया हे देश अण्वस्त्रचाचण्या करत असल्याचा मोठा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर चीन, पाकिस्तान, रशिया आणि उत्तर कोरिया हे देश अणुचाचण्या करत असल्याचा दावा करत अमेरिकेने पुन्हा अण्वस्त्रचाचण्या सुरू करण्याच्या निर्णयाचं समर्थन केल्याचं दिसून आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर अनेक देशांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली असून एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला उत्तर दिलं आहे. ‘आम्ही अणुचाचण्या पुन्हा सुरू करणारे पहिले देश राहणार नाही’, असं एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजशी बोलताना म्हटल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटलं की, “पाकिस्तान अणुचाचण्या करणारा पहिला देश नव्हता आणि अणुचाचण्या पुन्हा सुरू करणारा पहिला देश राहणारही नाही.” दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर ही प्रतिक्रिया दिली असली तरी अद्याप पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ किंवा त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे शाहबाज शरीफ यावर नेमकं काय बोलणार? हे देखील महत्वाचं असणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय दावा केला होता?
‘‘रशिया आणि चीन अण्वस्त्रचाचण्या करीत आहेत. पण, ते त्याविषयी काही बोलत नाहीत. आम्ही वेगळे आहोत. आम्ही त्याविषयी बोलतो… आम्ही चाचण्या नक्कीच करू. कारण ते आणि इतर चाचण्या करीत आहेत. उत्तर कोरिया आणि पाकिस्तानही चाचण्या करीत आहेत.’ आपण अण्वस्त्रे तयार केल्यावर त्याची चाचणीच केली नाही, तर कसे चालेल? अण्वस्त्रे काम करत आहेत, की नाही, हे कसे समजेल?”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
