बिहार विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, शरद पवार आणि मुलायमसिंह यादव या दोन बडय़ा नेत्यांची भाजपला मदत होईल अशा पद्धतीने पावले पडत आहेत. मुलायम यांनी तर राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीत तारिक अन्वर हे लोकसभेवर निवडून आल्याने राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या. वास्तविक बिहारमध्ये राष्ट्रवादीची ताकद बेताचीच आहे. केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशावाह हे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते, पण तारिक अन्वर यांनी त्यांचा पत्ता कापला. कुशावाह यांनी स्वत:चा पक्ष काढला व तीन खासदार निवडून आले. नितीशकुमार-लालूप्रसाद यादव-काँग्रेस आघाडीला राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, पण केवळ तीन जागा सोडल्याने राष्ट्रवादीने वेगळा घरोबा केला. राष्ट्रवादीची ताकदच मुळात कमी असल्याने १० ते १५ जागा सोडणे शक्य नसल्याचे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले होते.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून शरद पवार यांनी भाजपशी जुळवून घेतले आहे. मुलायमसिंह यादव यांच्या विरोधात सीबीआयची चौकशी सुरू असून, त्यातून त्यांना बाहेर पडायचे आहे. शरद पवार यांनी बिगरकाँग्रेस व बिगरभाजप नेत्यांची मोट बांधली. राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी मात्र भाजपला मदत करीत असल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे. नितीश-लालू यांनी राष्ट्रवादीकडे दुर्लक्ष केले. शेवटी आम्हाला पक्षाची ताकद वाढवायची आहे. यामुळेच मुलायमसिंह यांच्याबरोबर आघाडी केली आहे. बिहारमध्ये १५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेली मुस्लीम मते निर्णायक आहेत. तारिक अन्वर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आघाडीकडे जाणाऱ्या मुस्लीम मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे.