थुथुकुडी (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) तामिळनाडूतील नवीन प्रक्षेपण केंद्रासह सुमारे १७ हजार ३०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदींनी येथून जवळच असलेल्या कुलसेकरापट्टिनम येथे ‘इस्रो’च्या होत असलेल्या नव्या प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन केले. यासाठी सुमारे ९८६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे प्रक्षेपण केंद्र पूर्ण झाल्यानंतर येथून दर वर्षी २४ प्रक्षेपकांचे-अवकाशयानांचे प्रक्षेपण शक्य होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भाजपची पहिली यादी तीन दिवसांत? केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक

पंतप्रधानांनी थुथुकुडी येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. आपल्या तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्याची सांगता करण्यापूर्वी तिरुनेलवेली येथे भाजपच्या संबोधित करताना मोदींनी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघमवर (डीएमके) कडाडून टीका केली आणि केंद्राच्या योजनांमध्ये सहकार्य न केल्याचा आरोप केला. अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील चर्चेदरम्यान द्रमुकने संसदेतून सभात्याग केल्याची टीकाही मोदींनी केली. मोदी म्हणाले की, द्रमुकचे सभागृहातून असे पलायन जनतेच्या श्रद्धेविषयी द्रमुकला वाटत असलेला द्वेष दर्शवते. श्रीरामाशी तामिळनाडूचे संबंध सर्वश्रुत आहे. अयोध्येतील २२ जानेवारी रोजी राम मंदिर अभिषेक सोहळय़ापूर्वी, मी तामिळनाडूतील धनुषकोडीसह विविध मंदिरांना भेट दिली. एवढय़ा वर्षांनी मंदिर बांधले जात असल्याने संपूर्ण देश आनंदी होता.

हेही वाचा >>> अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश

संसदेत जेव्हा यासंबंधीचा मुद्दा

उपस्थित झाला तेव्हा द्रमुकचे खासदार पळून गेले.मोदींनी सांगितले, की द्रमुक आणि काँग्रेस समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. आम्ही मात्र सर्व समाजाला आमच्या एका कुटुंबाप्रमाणे मानतो. ‘द्रमुककडून मर्यादा उल्लंघन!’ द्रमुकवर टीका करताना मोदी म्हणाले, की या पक्षाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तामिळनाडूतील इस्रो प्रक्षेपण केंद्राचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी चीनचे ‘स्टिकर’ लावले. हा आपल्या देशाचा अपमान आहे, आपल्या देशभक्त अवकाश शास्त्रज्ञांचा अपमान आहे. तामिळनाडूचे लोक द्रमुकला याची नक्की शिक्षा देतील. भाजपच्या तामिळनाडू शाखेने आरोप केला, की, कुलसेकरापट्टिनम येथील ‘इस्रो’च्या नवीन केंद्राचे श्रेय घेण्यासाठी द्रमुकने एका जाहिरातीत चिनी ध्वजह्ण आणि चीनी भाषाह्ण वापरली आहे. हा संदर्भ घेत मोदींनी आरोप केला, की द्रमुक भारताच्या प्रगतीचे आणि अवकाश तंत्रज्ञानातील देशाच्या कामगिरीची प्रशंसा करायला तयार नाही. ही जाहिरात जनतेने भरलेल्या करातून दिली आहे. त्यात भारताच्या अवकाश क्षेत्रातील यशाचा उल्लेख नाही. त्यांना हे यश जगाला ठळकपणे दाखवायचे नाही. दरम्यान, द्रमुकच्या उपसरचिटणीस कनिमोळी यांनी सांगितले की, ‘इस्रो’चे नवीन प्रक्षेपण केंद्र योजना द्रमुकने गेल्या दहा वर्षांत विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi launches infrastructure projects worth over 17300 crore rupees in tamil nadu zws