PM Modi To Skip Address At UNGA In US: पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या काही दिवसांत डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ आणि रखडलेला व्यापार करार यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेल्याच्या पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानी अमेरिका दौरा टाळल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे ८० वे अधिवेशन ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, त्याची बैठक २३ ते २९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या बैठकीत बोलण्याची पहिली संधी ब्राझीलला मिळाली असून, त्यानंतर अमेरिका महासभेला संबोधित करेल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातर्फे या अधिवेशनाता सहभागी होणार होते. मात्र, आता ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संयुक्त रांष्ट्रांच्या अधिवेशनात कोण कोण बोलणार?
या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २३ सप्टेंबर रोजी जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत, दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांना हे त्यांचे पहिलेच संबोधन असेल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त, चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि इस्रायलचे राष्ट्रप्रमुख २६ सप्टेंबर रोजी या महासभेला संबोधित करतील.
भारत-अमेरिकेत तणाव
भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे आणि त्यामुळे पुति यांना युक्रेन युद्धात मदत मिळत आहे, असा आरोप करत अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादले आहे. दुसरीकडे, भारताने म्हटले आहे की, चीन रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो, परंतु त्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. याचबरोबर भारत अमेरिकन कृषी उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली करण्यास तयार नसल्याने दोन्ही देशांमधील व्यापार करारही रखडला आहे. या दोन प्रमुख मुद्द्यांमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.