PM Modi slam Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींनी आज आसामध्ये १८,५३० कोटी रूपयांहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आसामच्या दरांग येथे पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केले, यावेळी त्यांनी त्यांच्या दिवंगत आई हीराबेन मोदी यांच्याबद्दल झालेल्या शिवीगाळीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरून विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान म्हणाले की ते भगवान शिवाचे भक्त आहेत आणि शिव्यांचे विष गिळून टाकतील.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “१९६२ मध्ये चीनबरोबर जे युद्ध झाले, त्यानंतर पंडीत नेहरू जे म्हणाले होते, नॉर्थ ईस्टच्या लोकांचे त्या जखमा आजही बऱ्या झालेल्या नाहीत. त्या जखमांवर काँग्रेसची सध्याची पिढी देखील मिठ चोळण्याचे काम करत आहे.”

पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “मला कितीही शिव्या द्या. मी तर भगवान शिवाचा भक्त आहे, सर्व विष पिऊन घेतो. मात्र जेव्हा दुसऱ्याचा अपमान होतो तेव्हा मला राहावत नाही. तुम्ही मला सांगा की, भुपेन दा यांना भारतरत्न देण्याचा माझा निर्णय योग्य आहे की नाही? भूपेन दा यांना भारत रत्न दिला त्याचा काँग्रेसने अपमान केला हे चूक केलं की नाही? आज आसामच्या मुलाचा, भारताच्या सुपुत्राचा काँग्रेस असा अपमान करते खूप दु:ख होतं,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“मला माहित आहे की, यांची संपूर्ण इकोसिस्टम माझ्यावर तुटून पडेल आणि म्हणतील की मोदी पुन्हा रडत आहेत. माझ्यासाठी तर जनता हीच माझे दैवत आहे. जर माझ्या ईश्वराकडे जाऊन माझ्या आत्म्याची आवाज निघणार नसेल तर कुठे निघेल? हेच माझे मालक आहेत, हेच माझे पूजनीय आहेत.” असे पंतप्रधान मोदी आसामच्या दरंग येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर एका सभेत बोलताना म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित निवडणुक प्रचारादरम्यान आरजेडी-काँग्रेसच्या व्यासपीठावरून झालेल्या शिवीगाळ प्रकरणी पंतप्रधान मोदी काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहे. तर यावर विरोधकांचे म्हणणे आहे की जेव्हा हे वक्तव्य करण्यात आले तेव्हा त्यांचा कोणताही नेता व्यासपीठावर नव्हता. त्यानंतर, काँग्रेसने पंतप्रधानांच्या आईचा एआय-जनरेटेड व्हिडिओ तयार करत पोस्ट केल्याने नवा वाद निर्माण झाला.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, केंद्र सरकारने आसामचे महान गायक भूपेन हजारिका यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी त्यांना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे एक वक्तव्य दाखवले होते.

पंतप्रधान म्हणाले की, ज्या दिवशी भारत सरकारने या देशाचा महान सुपुत्र आणि आसामचा गौरव असलेले भूपेन हजारिका यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षांनी, मोदी गायक आणि नर्तकांना हा पुरस्कार देत आहेत. खरगे यांनी हे विधान २०१९ मध्ये केले होते. वाद झाल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिले होते.