PM Modi Reaction on NDA Victory in Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करीत २४३ पैकी २०० हून अधिक जिंकून जोरदार मुसंडी मारली. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा फटका बसला. राज्यात सत्ताविरोधी लाट असूनही विरोधकांना पन्नाशीचा आकडाही गाठता आला नाही. या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानत त्यांना आश्वासनदेखील दिलं आहे.

बिहारमध्ये एनडीएला दणदणीत बहुमत

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. त्यापैकी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २०० हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला पन्नाशीचा आकडाही गाठता आलेला नाही. बिहारमधील या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान मोदी सायंकाळी सहा वाजता दिल्लीतील भाजपा मुख्यालयाला भेट देणार असून विजयी जल्लोषात सहभागी होणार आहेत. यापूर्वी हरियाणासह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतरही पंतप्रधानांनी भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली होती.

आणखी वाचा : बिहारपाठोपाठ भाजपाचा जम्मू-काश्मीरमध्येही ऐतिहासिक विजय; पोटनिवडणुकीत काय घडलं?

पंतप्रधानांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. “सुशासनाचा विजय झाला आहे. विकासाचा विजय झाला आहे. जनकल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे. सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे,” असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनता-जनार्दनांची सेवा करण्याची आणि बिहारसाठी नव्या संकल्पाने काम करण्याची ताकद देणारा आहे”, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला विविध विकासकामांचं आश्वासन दिलं आहे.

बिहारमध्ये महाआघाडीचा सुपडासाफ

बिहारच्या निवडणुकीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार दिले होते; तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीसह एनडीएतील इतर मित्रपक्षांसाठी ४१ जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी भाजपाने ९० हून अधिक जागांवर तर जेडीयूने ८० पेक्षा जास्त जागावर आघाडी घेतली आहे. लोक जनशक्ती पार्टी जवळपास २८ जागांवर आघाडीवर असून इतर मित्रपक्षांनी चार जागांवर सरशी मिळवली आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या आरजेडीकडे ३० पेक्षा कमी आणि काँग्रेसला जवळपास चार जागांवर आघाडी मिळाली आहे.