गेल्या तीन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान काही शेतकरी आंदोलकांमुळे पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर १५ ते २० मिनिटे अडकून पडल्याचा दावा करण्यात आला. यावरून भाजपाकडून पंजाबमधील काँग्रेस सरकारवर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी देशभर जप देखील करण्यात आला. पण एकीकडे भाजपाकडून तीव्र संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाबमधील या प्रकारावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना सोशल मीडियावर नेटिझन्सनी मनमोहन सिंह यूपीएच्या काळात पंतप्रधान असतानाचा एक व्हिडीओ शोधून काढला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंजाबच्या सुवर्ण मंदिरात सपत्नीक दर्शनासाठी गेले असतानाचा हा व्हिडीओ असून त्यावरून वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ एनडीटीव्हीच्या एका लाईव्ह रिपोर्टिंगचा आहे. या व्हिडीओमध्ये लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अण्णा हजारेंचे समर्थक सुवर्ण मंदिराच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तसेच, पंतप्रधानांना काळे झेंडे देखील दाखवण्यात येत आहेत. याचवेळी पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मंदिरातच थांबवून ठेवल्याचं एनडीटीव्हीचे पत्रकार सांगताना दिसत आहेत. राज्यसभेत लोकपाल विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने हा जमाव संतप्त झाल्याचं या व्हिडीओत सांगण्यात येत आहे.

मनमोहन सिंग यांचा ताफा उभा असलेल्या ठिकाणाहून अवघ्या काही फुटांवर जवळपास २५ ते ३० लोकांचा जमाव घोषणाबाजी करताना दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ पोस्ट करत त्याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला पंजाबमध्ये थांबावं लागल्याच्या घटनेशी केली जात आहे. नरेंद्र मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत असताना त्याला प्रतिक्रिया म्हणून हा व्हिडीओ ट्वीट केला जात आहे.

तत्कालीन पंतप्रधान देखील वेगवेगळी वक्तव्य या मुद्द्यावरून करू शकले असते, पण त्यांन आपल्या सुरक्षा यंत्रणेवर विश्वास होता अशा पोस्ट या व्हिडीओसोबत केल्या जात आहेत.

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी? पंजाब सरकारचं भाजपाला प्रत्युत्तर; मुख्यमंत्री चन्नी म्हणाले…!

काय झालं होतं तेव्हा?

१ जानेवारी २०१२चा हा व्हिडीओ आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरशरण कौर हे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, तेव्हाच सुवर्णमंदिराच्या बाहेर अण्णा हजारेंच्या काही समर्थकांनी लोकपाल विधेयकासाठी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पंतप्रधान आणि त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच, पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी मंदिरातून बाहेर आल्यानंतर “पीएम गो बॅक” अशा घोषणा देखील लावल्या गेल्याचं सांगितलं गेलं. या घटनेच्या दोन दिवस आधीच २८ डिसेंबर २०११ रोजी राज्यसभेत लोकपाल विधेयक पारित होऊ न शकल्यामुळे त्यावरून संतापाची भावना होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi security laps in punjab manmohan singh golden temple video viral pmw