पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशाच्या विकासाबाबत त्यांची सविस्तर भूमिका मांडली. या भाषणातून त्यांनी गेल्या १० वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने कोणत्या योजना राबवल्या, याविषयी माहिती दिली. मात्र, त्याचवेळी आधीच्या सरकारकडून लाखो कोटींचा भ्रष्टाचार केला जात होता, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही टीकास्र सोडलं. यावेळी महिला सक्षमीकरणावर बोलताना मोदींनी त्यांच्या एका विदेश दौऱ्यावेळी घडलेला प्रसंगही सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझं स्वप्नं आहे की…”

आपल्या भाषणात मोदींनी महिला बचत गटांविषयी बोलताना देशाच्या गावांमध्ये २ कोटी लक्षाधीश महिला तयार करण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. “आज १० कोटी महिला महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. तुम्ही गावात गेलात तर तुम्हाला बँकवाली दीदी भेटेल, अंगणवाडीची दीदी भेटेल, औषध देणारी दीदी भेटेल. माझं स्वप्न आहे देशात दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

“जेव्हा भ्रष्टाचाराचा राक्षस देशाच्या मानगुटीवर बसला होता…”, लाल किल्ल्यावरून मोदींचं…

मोदी सरकारची महिलांसाठी ड्रोन योजना!

दरम्यान, ग्रामीण भागांत लक्षाधीश महिला तयार करण्यासाठी नरेंद्र मोदींनी ड्रोन योजना राबवणार असल्याचं सांगितलं. “शेती क्षेत्रात तंत्रज्ञान यावं यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांना आम्ही ड्रोन चालवण्याचं, दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण देणार आहोत. अशा हजारो महिलांना भारत सरकार ड्रोन देईल. त्याची सुरुवात आम्ही १५ हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून करणार आहोत”, असंही मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं.

विदेशात घडलेला ‘तो’ प्रसंग!

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एका विदेश दौऱ्यात तिथल्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं त्यांना विचारलेल्या प्रश्नाविषयी सांगितलं. “मी एका देशाचा दौरा करत होतो. तिथल्या एका फार ज्येष्ठ मंत्र्यांनी मला एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं ‘तुमच्याकडे मुली विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या विषयांचा अभ्यास करतात का?’ मी त्यांना म्हटलं आज माझ्या देशात मुलांपेक्षा जास्त मुली विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या शिक्षणात सहभागी होतात. तर त्यांच्यासाठी ती आश्चर्याची बाब होती. हे सामर्थ्य आज माझ्या देशाचं आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi speech on red fort speaks on women empowerment pmw