Bangladesh Mohammad Yunus : बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आणि शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडल्यानंतर आज बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात आज (८ ऑगस्ट) अंतरिम सरकार स्थापन झालं. दरम्यान, बांगलादेशच्या या अंतरिम सरकारमध्ये मोहम्मद युनूस यांच्यासह एकूण १५ सदस्यांनी शपथ घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाउंटवर (ट्विटर) पोस्ट करत मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करून बांगलादेश परत सामान्य स्थितीत येण्याची आम्ही आशा करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Muhammad Yunus : बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन; १५ सदस्यांनी घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी नवीन जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा. हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करून, बांगलादेश सामान्य स्थितीत लवकर परत येण्याची आम्ही आशा करतो. शांतता, सुरक्षा, विकासासाठी आणि लोकांच्या सामायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत बांगलादेशसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

अंतरिम सरकारसमोर आव्हान काय?

बांगलादेशमध्ये अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं असून या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस असणार आहेत. बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर देशात शांतता प्रस्थापित करण्याचं मोठं आव्हान मोहम्मद युनूस यांच्यासमोर अर्थात या अंतरिम सरकार समोर असणार आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकारला बांगलादेशमधील लष्कराने पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हानांचा सामना मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला करावा लागणार आहे.

प्राध्यापक ते अंतरिम सरकारचे प्रमुख

राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दिन यांनी मंगळवारी बांगलादेशची संसद विसर्जित केली आणि अर्थतज्ज्ञ असलेल्या मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. आंदोलक विद्यार्थी चळवळीने त्यांना सरकारचे प्रमुख बनविण्याची मागणी रेटून धरली होती. यामुळे त्यांना अंतरिम सरकारचे नेतृत्व सोपवण्यात आले. मोहम्मद युनूस जागतिक पातळीवर ‘द फादर ऑफ मायक्रोफायनान्स’ म्हणून ओळखले जातात. त्यांना २००६ मध्ये त्यांना गरीबी निर्मूलनाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi to best wishes muhammad yunus bangladesh interim government marathi news gkt