पीटीआय, जयपूर
कारवाई थांबवण्यासाठी भ्रष्ट लोक एकत्र येत आहेत अशी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. राजस्थानमधील कोटपुतली येथील सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
भाजप जिंकल्यास देशात आग लागेल अशी धमकी काँग्रेस नेते सातत्याने देत आहेत. गेल्या दहा वर्षांत विकासाची अनेक कामे झाली. मात्र अद्याप बरीच कामे बाकी आहेत. भाजप सरकारचा तिसरा कार्यकाळ हा ऐतिहासिक निर्णयांचा असेल असे संकेत त्यांनी दिले. भ्रष्टाचाराचा नायनाट करणारी ही निवडणूक आहे. मात्र काँग्रेस तसेच विरोधक हे देशासाठी नव्हे तर आपले हेतू साध्य करण्यासाठी िरगणात आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला. भारताला जगात तिसरी अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही या निवडणुकीचे महत्त्व असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अनेक दशके जे निर्णय प्रलंबित होते ते आम्ही घेतले असा दावा पंतप्रधानांनी केला. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे तसेच राम मंदिर उभारणी आणि तिहेरी तलाकबाबतचा कायदा ही सरकारची महत्वपूर्ण कामे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व इतर नेते उपस्थित होते.