पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जपानचा दौरा आटोपून संध्याकाळी चीनला पोहोचले. मोदी तब्बल सात वर्षांनंतर चीनला गेले असून रविवारी ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आयातशुल्काच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मोदी तियान्जिन येथे रविवारी आणि सोमवारी होणाऱ्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत.
मोदी आणि जिनपिंग यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीत आर्थिक संबंधांचा आढावा घेतला जाईल, तसेच पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करून द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली जाईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी भारत आणि चीनने एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी तियान्जिन येथे पोहोचल्यानंतर त्यांचे तेथील भारतीय समुदायाने तसेच चिनी नागरिकांना उत्साहाने स्वागत केले. मोदींच्या सन्मानार्थ चिनी कलाकारांनी भारतीय नृत्य-गायन आणि वादन कला सादर केल्या.
त्यापूर्वी, मोदी यांच्या जपान दौऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान १३ महत्त्वाचे करार करण्यात आले. तसेच द्विपक्षीय सहकार्याने अनेक उपक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हा दौरा रचनात्मक परिणामामुळे लक्षात राहील असे मत मोदी यांनी जपानमधून निघताना व्यक्त केले.