दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील रहिवासी चीनी लोकांसारखे दिसतात, असं वक्तव्य काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपासह एनडीएमधील पक्षांनी आणि नेत्यांनी पित्रोदा यांच्यासह काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पित्रोदांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यापासून ते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मोदी यांनी या वक्तव्यावरून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. पित्रोदांचं वक्तव्य भारतीय जनतेचा अपमान असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका होत असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बचावासाठी पुढे आले आहेत. चव्हाण यांनी म्हटलं आहे की, पित्रोदांच्या वक्तव्याशी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नाही. तसेच ते काही आमचे प्रवक्तेदेखील नाहीत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळे काही लोक गोंधळ घालतायत मात्र पित्रोदा हे मुळात भारताचे नागरिक नाहीत. ते अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरून फार गोंधळ घालण्यात अर्थ नाही. त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तीगत मत असू शकतं. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तसाच अधिकार सॅम पित्रोदा यांनादेखील आहे. अमेरिकेत तर मत मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आपल्यापेक्षा (भारतापेक्षा) जास्त आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. मला वाटतं आपण त्यांचं वक्तव्य खूप गांभीर्याने घ्यायची गरज नाही. ते त्यांचं व्यक्तीगत वक्तव्य आहे. ते काही पक्षाचं वक्तव्य नाही किंवा ती पक्षाची अधिकृत भूमिकादेखील नाही. त्याचबरोबर पित्रोदा हे काही काँग्रेसचे अधिकृत प्रवक्तेदेखील नाहीत.

भाजपा नेत्यांचा पित्रोदांवर हल्लाबोल

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनीदेखील पित्रोदा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. ते पित्रोदांना उद्देशून म्हणाले, “सॅम भाई, मी ईशान्य भारतातला नागरिक आहे. परंतु, मी भारतीय लोकांसारखाच दिसतो. आपला देश विविधतेने नटलेला आहे. कदाचित आपण भिन्न दिसत असू मात्र आपण सर्वजण एकच आहोत,” तर अभिनेत्री आणि भाजपाची लोकसभेची उमेदवार कंगना रणौत म्हणाली, त्यांचं वक्तव्य वर्णद्वेषी आणि विभाजनवादी आहे. हे महाशय राहुल गांधी यांचे मार्गदर्शक आहेत.

हे ही वाचा >> “मी मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, पंतप्रधान मोदींची रोखठोक भूमिका

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीदेखील पित्रोदांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सीतारमण म्हणाल्या, “मी दक्षिण भारतीय असून मी भारतीयांसारखीच दिसते. माझ्याबरोबर काम करणारे माझे ईशान्य भारतातील मित्रदेखील भारतीय दिसतात. पश्चिम भारतातील माझे सहकारीही भारतीयच दिसतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan says sam pitroda is not indian citizen on south indian african racist comment asc