Punjab CM Bhagwant Mann slams PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पाच देशांचा परराष्ट्र दौरा आटपून भारतात परतले आहेत. यावरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोदी व परराष्ट्र मंत्रालयावर टीका केली आहे. भारताचं परराष्ट्र धोरण व अभिनेता दिलजीत दोसांझच्या चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्रीवरून चालू असलेल्या वादावरही त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.
भगवंत मान यांनी अलीकडेच भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून परराष्ट्र विभागाने मान यांच्यावर टीका केली होती. त्यावर मान म्हणाले, “आपल्या पंतप्रधानांना परराष्ट्र धोरण काय आहे हे विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही का? मोदी जगभर फिरतायत. परंतु, आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा कोण देतंय? आणि जर कोणी पाठिंबा देत नसेल तर मोदी जगभर का फिरतायत?”
भगवंत मान यांची पंतप्रधान मोदींवर उपहासात्मक टीका
भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कुठलंही राजकीय कारण नसताना, किंवा कुठलाही फायदा होत नसताना वेगवेगळ्या देशांचे दौरे करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी अशा राष्ट्रांना भेट देत आहेत ज्यांची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत. मोदी लहान-लहान राष्ट्रांकडून स्वतःचा सन्मान करून घेत आहेत. आपल्याकडे जेसीबीद्वारे चालू असलेलं खोदकाम बघायला जितके लोक जमा होतात तेवढी लोकसंख्या असलेल्या देशांना मोदी भेटी देतात.
परराष्ट्र मंत्रालयाचा भगवंत मान यांच्या वक्तव्यांवर आक्षेप
परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र दौऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या भगवंत मान यांच्या वक्तव्यांवर आक्षेप नोंदवला होता. आपल्या परराष्ट्र धोरणाबाबतची एका वरिष्ठ पदावर असलेल्या नेत्याची वक्तव्ये बेजबाबदार असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं होतं. भगवंत मान यांचा नामोल्लेख टाळत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की “भारत ग्लोबल साउथमधील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करत आहे. मात्र, या संबंधांबद्दल एका नेत्याच्या टिप्पण्या आम्ही पाहिल्या आहेत, ज्या खूपच बेजबाबदार व खेदजनक आहेत. एखाद्या राज्याच्या प्रमुखांच्या तोंडी अशी वक्तव्ये शोभत नाहीत.”