Ravi Returns to Lahore: अविभाजित पंजाब प्रांताची ओळख आणि पाकिस्तानच्या लाहोर शहराची एकेकाळची जीवनवाहिनी असलेल्या रावी नदीने चार दशकानंतर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. रावी नदीचे हक्काचे पात्र तिने पुन्हा एकदा मिळवल्यामुळे लाहोरमधील नागरिकांच्या आठवणी दाटून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडियावर सध्या रावीच्या ओसंडून वाहणाऱ्या पात्राची चर्चा आहे. तिचे वाहते रूप पाहण्यासाठी लाहोरमधील पुलावर लोकांनी गर्दी केलेली दिसत आहे.
रावी नदीने शेवटची आंतरराष्ट्रीय सीमा १९८८ साली ओलांडली होती. द इंडियन एक्सप्रेसच्या दिव्या गोयल यांनी रावी नदीच्या पाकिस्तान प्रवेशावर एक सविस्तर लेख लिहिला आहे. रावी नदीचा इतिहास, तिचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणि नदीशी निगडित असलेल्या पंजाब प्रांताच्या आठवणींचा आढावा त्यांनी घेतला आहे.
यंदा पंजाबमध्ये अभूतपूर्व असा पाऊस बरसत असून त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली असून सगळीकडेच पाणीच पाणी दिसत आहे. रावी नदीचे १४ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी पाकिस्तानात वाहून गेले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार १९८८ साली ११ लाख क्युसेक पाणी वाहून गेले होते. रावी नदीच्या पूरामुळे भारत आणि पाकिस्ताच्या सीमेवरील अनेक शहरे आणि गावे पाण्याखाली गेली आहेत. भारतातील गुरुदासपूर, पठाणकोटपासून ते पाकिस्तानमधील नारोवाल, साहिवाल, कसूर आणि लाहोरपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे.
पाकिस्तानातील रावी नदीपात्रात अनेक वर्षांपासून अतिक्रमण सुरू आहे. पाकिस्तानमधील मंत्र्यांनी याठिकाणी गृहसंकूल उभारले आहेत. यामुळे रावीला आलेला पूर हा जमीन अतिक्रमणकर्त्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आला आहे, अशी भावना लाहोरमधील रहिवासी व्यक्त करत आहेत. फैसलाबाद येथील शासकीय विद्यापीठातील इतिहासाचे सहाय्य्क प्राध्यापक डॉ. मजहर अब्बास म्हणाले की, रावी नदी एक संदेश घेऊन आली आहे. तुम्ही नदीची जमीन बळकवली तरी एक ना एक दिवस ती तिची जमीन परत घेतेच. अतिक्रमणकर्त्यांना ही चपराक आहे.
भारत ते पाकिस्तान, रावी नदीचा प्रवास
हिमाचल प्रदेशातील बारा भांगल प्रदेशात रावी नदीचा उगम होतो. चंबा खोऱ्यातून ती पंजाबमध्ये प्रवेश करते. पंजाबच्या पठाणकोट, अमृतसर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांमधून वाहत ती नारोवालमार्गे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रवेश करतो. पुढे लाहोरमधून वाहत ती चिनाब नदीत विलीन होते.
सिंधू जल करारानुसार वाटप कसे?
१९६० च्या सिंधू जल करारानुसार रावी, सतलज आणि बियास या नद्यांचे पाणी भारताला तर झेलम, चिनाब आणि सिंधू या तीन पश्चिम वाहिनी नद्यांचे नियंत्रण पाकिस्तानला देण्यात आले. भारताने रणजित सागर धरण आणि शाहपूर येथे बॅरेज बांधून रावी नदीचा मार्ग वळवला. यामुळे पाकिस्तानमधील पात्र कोरडे पडले.
गीतांमधून रावी अजूनही प्रवाही
लाहोरमधील रावीचे पात्र बोडके झाल्यानंतर तिथे कचराकुंड्या, अतिक्रमण जोम धरू लागले. तरीही वृद्ध, कवी आणि गीतकारांच्या आठवणीतून रावी हरवली नाही. लोकगीतांच्या माध्यमातून रावीच्या आठवणी आजही ताज्या आहेत. आता रावी नदीचे पात्र जेव्हा पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागले आहे, तेव्हा हीच गीते पुन्हा एकदा लाहोरमधील लोकांच्या तोंडी येऊ लागली आहेत.
प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांची मुलगी आणि लाहोरची रहिवासी नुझहत मंटो यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, दोन्ही देशांनी निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत.