मोदी या आडनावाचे सगळे लोक चोर का असतात? हा प्रश्न विचारल्यानंतर दाखल झालेल्या केसमध्ये राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेलं आहे. असं असलं तरीही राहुल गांधी हे काही गौतम अदाणी यांचा मुद्दा सोडायला तयार नाहीत. शरद पवार यांनीही अदाणींच्या मुद्द्यावर जास्तच गदारोळ झाला हे म्हटलं आहे. तसंच नावही माहित नसलेल्या कंपनीच्या अहवालावरून इतका गदारोळ करणं योग्य नाही असं म्हणत राहुल गांधींचे कान टोचले आहेत. मात्र राहुल गांधी गौतम अदाणींचा मुद्दा सोडायला तयार नाहीत. राहुल गांधी यांनी ट्वीट करून एक वर्ड पझल दाखवलं आहे. त्यात काही लोकांची नावं आहेत आणि ती नावांमध्ये अदाणी हे नाव कसं लपलं आहे हे त्यांनी दाखवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे ट्वीटमध्ये राहुल गांधींनी?

हे लोक सत्य लपवतात म्हणूनच रोज लोकांची दिशाभूल करतात. अदाणींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुणाचे आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे. त्यामध्ये त्यांनी गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांची नावं लिहिली आहेत. त्या नावांमधून बरोबर अदाणी हे नाव कसं समोर येतं हे या वर्ड पझलमध्ये दाखवलं आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

गुलाम नबी आझाद यांनी २०२२ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे त्यामध्ये त्यांनी आपण राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्ष सोडल्याचं म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी कौतुक केलं आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या वर्ड पझलमध्ये पहिलं नाव आहे ते आझाद यांचं

त्यानंतर अदाणी मधल्या डी या अक्षरासाठी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आडनावाचा वापर केला आहे. खरंतर शिंदे कुटुंब हे पक्के काँग्रेसी होते. तसंच ज्योतिरादित्यांचे वडील आणि राजीव गांधी यांची खास मैत्री होती. मात्र २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपात गेले. त्यानंतर आता राहुल गांधींनी वर्ड पझलच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केलं आहे.

किरण कुमार रेड्डी हे देखील काँग्रेसमध्ये होते. आंध्र प्रदेशचे ते माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला आणि राहुल गांधींनी त्यांच्या नावाचा वापर अदाणी ही अक्षरं जुळवण्यासाठी केला आहे.

हिमंता बिस्वा सरमा हे कायमच काँग्रेसवर आणि खास करून राहुल गांधींवर तुटून पडत असतात हे आपण पाहिलं आहेच. २०१५ मध्ये ते भाजपात आले आहेत. राहुल गांधींवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत त्यामुळे यांच्या नावाचा आधार घेत राहुल गांधींनी अदाणी हे पझल जुळवलं आहे.

त्यापुढंचं नाव आहे ते अनिल अँटनी यांचं. अनिल अँटनी यांनी नुकताच भाजपात प्रवेश करत काँग्रेसला दे धक्का दिला. ए. के. अँटनी यांचे ते सुपुत्र आहेत. ADANI हे पूर्ण आडनाव जुळवण्याठी शेवटचं नाव अनिल अँटनी यांचं लिहिण्यात आलं आहे. या वर्ड पझल ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi adani attack on ghulam nabi azad jyotiraditya scindia kiran kumar reddy himanta biswa sarma anil antony word puzzle scj