Congress post on Rahul Gandhi Nobel Prize: व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना त्यांच्या देशातील हुकूमशाहीविरोधात लढून लोकशाही हक्कांसाठी आग्रही राहिल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर काँग्रेसने त्यांचे कौतुक करत असताना भारतात राहुल गांधीही अशाचप्रकारचे कार्य करत असल्याचे म्हटले. काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी शुक्रवारी म्हटले की, राहुल गांधी संविधान वाचविण्यासाठी लढत असून तेही अशाच प्रकारे पुरस्कारासाठी पात्र आहेत. यानंतर भाजपाने या पोस्टवर काँग्रेसला टोला लगावला आहे.

सुरेंद्र राजपूत यांनी मारिया कोरिना मचाडो आणि पाचवेळा खासदार राहिलेले, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोटो एक्सवर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये ते म्हणाले, यावेळचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना संविधानाचे रक्षण केल्याबद्दल मिळाला आहे. भारतात विरोधी पक्षनेते राहु गांधी देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत.

नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली. व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणे, तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांना २०२५ या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.

विरोधी पक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असलेल्या मारिया मच्याडो यांनी राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सरकारविरुद्ध एकेकाळी विभाजित असलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणले. याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत होते, असे नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन व्हॅट्ने फ्रिडनेस यांनी म्हटले.

काँग्रेस प्रवक्त्यांनी तुलना का केली?

राहुल गांधी यांनी विद्यमान एनडीए सरकारच्या अघोषित हुकूमशाही विरोधात संविधानाचे रक्षण करण्यासाठी युद्ध पुकारले असल्याचा युक्तिवाद काँग्रेसकडून नेहमी केला जातो. यापूर्वी भारत जोडो यात्रा, यंदा बिहारमध्ये मत चोरी यात्रा काढून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

भाजपाने लगावला टोला

काँग्रेस प्रवक्त्यांनी केलेल्या विधानावर भाजपाने चिमटा काढला आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक्सवर पोस्ट करत सुरेंद्र राजपूत यांच्या पोस्टचा समाचार घेतला. पूनावाला यांनी राहुल गांधींना नोबेल देण्याची मागणी विचित्र असल्याचे म्हटले.

“राहुल गांधींना नोबेल मिळावा, अशी मागणी काँग्रेसने करणे हे जरा विचित्र आहे. त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकतो पण तो १) ढोंगीपणा २) खोटे बोलणे ३) ९९ निवडणुकांमध्ये पराभव होणे ४) १९७५ आणि १९८४ मध्ये लोकशाही आणि संविधानाची हत्या करणे.

या कारणांसाठी त्यांना नक्कीच पुरस्कार मिळायला हवा, असा टोला पूनावाला यांनी लगावला.