पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक चर्चेच्या पुढाकाराचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कौतुक केले. ‘मी किंवा पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना अशा चर्चेत भाग घेण्यास आनंद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या चर्चेत भाग घेतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सुदृढ लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी देशासमोर एका व्यासपीठावरून त्यांचा दृष्टिकोन मांडणे हा एक सकारात्मक उपक्रम असेल, असेही राहुल यांनी ‘एक्स’वर म्हटले. या चर्चेत मोदींनीही भाग घ्यावा, अशी देशाची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.

माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर, अजित पी. शहा आणि एन. राम यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित निवडणुकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या तिघांनी चर्चेचा प्रस्ताव नि:पक्षपाती आणि प्रत्येक नागरिकाच्या व्यापक हितासाठी असल्याचे म्हटले होते. त्यावर राहुल यांनी ‘एक्स’वरून उत्तर दिले.

हेही वाचा >>>काँग्रेस ५० जागाही जिंकणे कठीण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

‘मी चर्चेच्या निमंत्रणाबाबत पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी यासाठी होकार दर्शवत, अशा चर्चांमुळे जनतेला आमचा दृष्टिकोन समजण्यास आणि एखाद्याची निवड करण्यास मदत होईल. अशा चर्चांमुळे राजकीय पक्षांवर होणारे निराधार आरोप थांबतील, शिवाय निवडणूक लढणारे प्रमुख पक्ष म्हणून जनतेने त्यांच्या नेत्यांना थेट ऐकणे योग्य ठरेल, त्यामुळे मला किंवा काँग्रेस अध्यक्षांना अशा चर्चांमध्ये सहभागी होण्यास आनंद होईल आणि आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत, असेही राहुल म्हणाले.

पण मोदी तयार होणार नाहीत…

‘आम्हाला कळवा, की पंतप्रधान कधी आणि केव्हा सहभागी होण्यास तयार आहेत, त्यानंतर आम्ही चर्चेचे तपशील आणि स्वरूप यावर चर्चा करू’, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी लखनौमधील एका कार्यक्रमात, श्रोत्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना गांधी म्हणाले, की ते वादविवादात मोदींना सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. परंतु मोदी त्यासाठी तयार होणार नाहीत, असा दावा राहुल यांनी केला होता.