पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे उमेदवारी अर्ज भरत असताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतःच्या जन्माबाबत केलेला दावा आता चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे.” मोदींच्या या विधानावर आता राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. एका प्रचार सभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, एखादा सामान्य माणूस जर असे बरळला असता, तर त्याच्याशी आपण कसे वागलो असतो. पण पंतप्रधान मोदी हे आता काहीही बोलू लागले आहेत.

राहुल गांधी काय म्हणाले?

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चमच्यांना मुलाखत देत असताना बिनधास्त म्हणतात की, ते जैविकरित्या जन्मलेले नाहीत. तर त्यांना देवाने एका ध्येयासाठी पाठविले आहे. रस्त्यावर जर एखाद्या सामान्य माणसाने आपल्याला असे म्हटले तर आपण त्याला काय बोलणार? आपण म्हणू की, ‘माफ कर बाबा, पुढं जा. पण मोदींचे चमचे मात्र त्यांच्या अजब विधानांची प्रशंसा करतात, त्यावर वाह-वाह म्हणतात”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Video : “माझा जन्म झालेला नाही, मला देवानेच पाठवले”, पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान चर्चेत

देवा असा कसा माणूस पाठवलास

राहुल गांधी पुढे म्हणाले, “करोना काळात गंगा नदीत शव वाहत होते. यमुनेच्या तिरावर मृतदेह अंत्यसंस्काराविना पडले होते. रुग्णालयाच्या दारातच रुग्ण जीव सोडत होते, अशा भीषण परिस्थितीत ज्यांना देवाने पाठविले आहे, ते काय म्हणायचे? ते म्हणायचे, तुमच्या मोबाइलची टॉर्च सुरू करा. युवक जेव्हा रोजगार मागतात, तेव्हा देवाचे अवतार म्हणतात की, गटारात पाईप टाकून त्यातील जो गॅस आहे, त्यापासून भजे तळा. आम्ही देवाला विचारतो, देवा असा कसा माणूस पाठवलास.”

मोदी फक्त २२ लोकांसाठी काम करतात

देवाने पाठविलेला माणूस फक्त २२ लोकांसाठी काम करतो. अदाणी, अंबानी यांना जे हवं, ते काम २४ तासांत करून दिलं जातं. पण शेतकरी कर्जमाफी मागतो, तेव्हा पंतप्रधान मोदी फक्त पाहत राहतात, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.