पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना तिसऱ्या टर्ममध्ये ते काय काम करणार आहेत, याची माहिती देत होते. मात्र न्यूज १८ इंडिया ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. तुम्ही थकत का नाहीत? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर मोदी म्हणाले, “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे.” पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूज १८ इंडिया च्या पत्रकाराने सदर मुलाखतीमधील या भागाचा व्हिडीओ स्वतःच्या एक्स अकाऊंटवर टाकल्यानंतर बऱ्याच जणांनी त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकाराने विचारले की, पाच वर्षांपूर्वी तुम्हाला मी विचारले होते की, तुम्ही थकत कसे नाहीत. आताही तोच प्रश्न तुम्हाला विचारत आहेत की, तुम्ही थकत कसे नाहीत.

देवानेच मला पाठवले, माझी मानवी शरीर नाही

पंतप्रधान मोदी यांनी १४ मे रोजी वाराणसी लोकसभेसाठी अर्ज भरला होता. यावेळी त्यांनी न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचे की, माझा जन्म झाला असावा. पण आईच्या जाण्यानंतर मी सर्व अनुभवांना एकत्रित करून पाहतो, तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, देवानेच मला पाठवले आहे. माझ्यातील ऊर्जा ही मानव शरीरातून मिळालेली नाही. ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्यामाध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे. यासाठीच मला सामर्थ्यही प्रदान केले आहे. तसेच मला पुरुषार्थ गाजविण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे. मी काही नी तर देवाचे साधन आहे. देवाने माझ्या रुपातून काहीतरी काम करणे ठरविले आहे. त्यामुळेच परिणामांची चिंता न करता मी काम करत जातो.”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, “माझ्या या विधानावर डाव्या विचारांचे लोक टीका करू शकतात. पण माझ्या मनाला मात्र ही गोष्ट पटली आहे. मीही एक पुजारी आहे, एक भक्त आहे. मी भारतातील १४० कोटी लोकांना देवाचे रुप मानतो. माझ्यासाठी तेच देव आहेत.”