Rahul Gandhi on What Congress Went Wrong in Haryana Elections 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमत गाठेल, अशी शक्यता सर्वच एग्झिट पोल्सनी वर्तविली होती. मात्र काल (८ ऑक्टोबर) मतमोजमीच्या काही तासातच भाजपाने आघाडी गाठली आणि मतमोजणी पूर्ण होईपर्यंत त्यांनी बहुमताचा निश्चित आकडाही पार केला. यामुळे काँग्रेसची बरीच नाचक्की झाली. निकालाच्या आधीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाले होते. मात्र त्यांना सलग तिसऱ्यांदा पराभव सहन करावा लागला. हरियाणात काँग्रेसचा विजय होणारच, असा दावा काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. मात्र त्यांचा दावा फोल ठरला. यावर आता राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक्स अकाऊंटवर त्यांनी पोस्ट टाकत हरियाणाच्या पराभवावर भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी सर्वात आधी जम्मू-काश्मीरच्या लोकांचे आभार मानले. “राज्यात इंडिया आघाडीचा विजय झाल्यामुळे संविधानाचा विजय झाला. लोकशाहीच्या स्वाभिमानाचा विजय झाला”, असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच हरियाणा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आयोगाबद्दल तक्रारी येत आहेत. त्याबद्दलही कार्यवाही करू. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल हरियाणामधील सर्व नागरिकांचे मनस्वी आभार आणि आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आम्ही सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठीचा आणि सत्याचा संघर्ष सुरूच ठेवू.”

हे ही वाचा >> विरोधात वातावरण, तरीही भाजपानं सत्ता कशी खेचून आणली? हे ‘पाच’ मुद्दे ठरले कळीचे

हरियाणातील विधानसभेच्या ९० जागांसाठी दि. ५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. काल (८ ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरबरोबर हरियाणाचेही निकाल लागले. तत्पूर्वी ५ तारखेला आलेल्या अनेक एग्झिट पोल्सनी काँग्रेसला सत्ता मिळेल, असे भाकीत वर्तविले होते. मात्र लोकसभेनंतर पुन्हा एकदा एग्झिट पोल्स खोटे ठरले आहेत. या निवडणुकीत ९० पैकी ४८ जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. बहुमतासाठी ४६ जागांची गरज आहे. त्यामुळे भाजपाने यंदा स्पष्ट बहुमत मिळवले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने केवळ ४० जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विरोधात वातावरण असूनही भाजपाने यंदा यश खेचून आणले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi first reaction on congress haryana assembly election loss kvg