विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या एका खटल्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथील जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला असून २०१८ साली राहुल गांधींविरोधात याबाबत तक्रार करण्यात आली होती.
जामिनासाठी दाखल केला होता अर्ज
न्यायालयाच्या या निर्णयाबाबत वकील तारकेश्वर सिंह यांनी अधिक माहिती दिली. “राहुल गांधी यांना मानहानीच्या या खटल्यात समन्स जारी करण्यात आले होते. समन्सनंतर राहुल गांधी कोर्टात हजर झाले होते. याआधी जामीन मिळावा यासाठी राहुल गांधी यांच्याकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे,” असे तारकेश्वर यांनी सांगितले.
राहुल गांधी निर्दोष, वकिलांचा दावा
तक्रारदाराचे वकील संतोष पांडे यांनीदेखील या खटल्याबाबत अधिक माहिती दिली. “राहुल गांधी हे निरापराध असून, त्यांनी मानहानीकारक विधान केलेले नाही, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत त्यांचा गुन्हा हा जामीनपात्र आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला,” असे संतोष पांडे यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्यावर नेमका आरोप काय?
भाजपाचे नेते विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २००५ सालच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात अमित शाहांना दोषमुक्त केले होते. या प्रकरणादरम्यान अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री होते. त्याच्या चार वर्षांनी राहुल गांधी बंगळुरू येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाहांवर एक विधान केले होते. हेच विधान मानहानीकारक असल्याचा दावा मिश्रा यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या खटल्यासंदर्भात आता राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.