Rahul Gandhi Press Conference on ECI: केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातले काही पुरावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावं वगळण्यासाठी त्यांच्या ओळखीचा वापर भलत्याच व्यक्तींनी केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, यासाठी राज्याबाहेरचे मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी वापरले गेल्याचंही ते म्हणाले. जवळपास पाऊण तास चाललेल्या सादरीकरणानंतर राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
यावेळी पुरावे सादर करताना राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली. “देशात चालू असलेली मतचोरी कोण करतंय हे निवडणूक आयुक्तांना माहिती आहे. पण ते या सगळ्या घोटाळेबाजांना पाठिशी घालत आहेत, त्यांचा बचाव करत आहेत”, असा आरोप राहुल गांधींनी केला.
“कर्नाटकमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला. राज्य सीआयडीनं निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातली माहिती मार्च २०२३ मध्ये मागितली. ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगानं उत्तर दिलं, पण त्यात माहिती दिलेली नव्हती. जानेवारी २०२४ मध्ये सीआयडीनं पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून पूर्ण माहितीची मागणी केली. पण त्यावर उत्तर आलं नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये सीआयडीनं निवडणूक आयोगाला शेवटचं पत्र लिहिलं. हे सगळं होत असताना कर्नाटक निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि या माहितीची मागणी केली. अनेकदा ही मागणी केली गेली. पण त्यावर काहीही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे हा स्पष्ट पुरावा आहे की जे लोक हे करत आहेत, त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत”, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मागितली तीन प्रकारची माहिती
पत्रकार परिषदेत वोट चोरीचा आरोप करताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे तीन प्रकारच्या माहितीची मागणी केली आहे.
१. मतदारांची नावं वगळण्यासाठीचे अर्ज केले त्या उपकरणांचा आयपी
२. नावं वगळण्यासाठीचे अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांचे पत्ते
३. अर्ज केल्यानंतर आलेले ओटीपी नेमके कुणाकडे गेले याची माहीती
ही सर्व माहिती निवडणूक आयोगाने न दिल्यास ते घोटाळेबाजांना वाचवत असल्याचं सिद्ध होईल, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला ७ दिवसांचा अल्टिमेटम!
“आता प्रश्न आहे की हे सगळं कोण करतंय? याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे आहे. हे जे कुणी करत आहेत, ते थेट भारताच्या राज्यघटनेवर हल्ला करत आहेत. आणि अशा लोकांना मुख्य निवडणूक आयुक्त वाचवत आहेत. ते कर्नाटकच्या सीआयडीलाही माहिती देत नाहीयेत”, असं राहुल गांधी म्हणाले.
“ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना वाचवणं बंद केलं पाहिजे. आम्ही १०० टक्के पुरावे सादर केले आहेत. हे पुरावे कुणीही नाकारू शकत नाही. निवडणूक आयोगाने आठवड्याभरात सगळी माहिती जाहीर करावी. नाहीतर ज्ञानेश कुमार घोटाळे करणाऱ्यांना वाचवत असल्यावर शिक्कामोर्तब होईल”, अशी मागणी यावेळी राहुल गांधींनी केली.
पुढचे २ ते ३ महिने असेच पुरावे देणार!
“मी इथे जे करतोय, ते माझं काम नाहीये. माझं काम लोकशाही प्रक्रियेचं संरक्षण करणं नसून त्या प्रक्रियांमध्ये सहभागी होणं आहे. संरक्षणाचं काम देशातल्या यंत्रणांचं आहे. पण या यंत्रणा हे काम करत नाहीयेत, त्यामुळे मला हे करावं लागत आहे. जेव्हा आम्ही येत्या २-३ महिन्यांत हे पुरावे देण्याचं काम संपवू, तेव्हा लक्षात येईल की भारतात प्रत्येक निवडणूकगणिक मतचोरी झाली आहे”, असंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.