काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या भाषणात मोदी सरकारवर परखड शब्दांत टीका केली. त्यानंतर आज छत्तीसगडमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “७० वर्षांत काय झालं? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करता, तेव्हा तुम्ही काँग्रेसचा नाही तर हा देश घडवणाऱ्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करता”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. यासोबतच राहुल गांधी यांनी यावेळी भाजपा भारतात दोन देश करू पाहात आहे, या आपल्या विधानाचा देखील पुनरुच्चार यावेळी केला.

“देशासमोरचा सगळ्यात भयंकर धोका म्हणजे…”

“भाजपा आणि त्यांची विचारसरणी आपल्या प्रिय देशाला धोक्याच्या दिशेने घेऊन जात आहे. मी काल संसदेत हे समजावून सांगितलं. आजही तुम्हाला सांगतो. धोका कोणत्या गोष्टीचा आहे? सगळ्यात पहिला भयंकर धोका म्हणजे भाजपा आज एक देश दोन देशांमध्ये विभागतंय. दोन नवे देश बनवले जात आहेत. एक देश निवडक करोडपतींचा. त्या देशात विमाने, अद्ययावत तंत्रज्ञान, स्टॉक मार्केटचा पैसा.. त्या देशात जेवढी देशाची संपत्ती तुम्हाला हवी, तुम्ही घेऊ शकता. दुसरा देश आपल्या प्रिय देशवासीयांचा, कोट्यवधींचा देश”, असं राहुल गांधी म्हणाले.

Video : “तुम्ही माझा अपमान करा, मला फरक पडत नाही, पण…”; संसदेत राहुल गांधींचा सरकारवर निशाणा!

“एक श्रीमंत देश शे-पाचशे लोकांचा आणि दुसरा देश भारतातल्या कोट्यवधी नागरिकांचा. त्यांना वाटतं दोन देश बनवल्यामुळे गरीबांचा देश शांत बसून राहील. गरिबांमध्ये शक्ती नाही. भारतातला गरीब घाबरतो. पण हिंदुस्थानमधला गरीब घाबरत नाही”, असं देखील राहुल गांधी म्हणाले.

तो काँग्रेसचा अपमान नसतो, तर…!

“जर या देशाला कुणी इथपर्यंत पोहोचवलंय, देशात प्रगती झाली आहे, तर ती कुठल्या पक्षामुळे झालेली नाही. ती भारतातल्या गरीबांनी घडवून आणली आहे. जेव्हा तुम्ही म्हणता ७० वर्षांत काय झालं? तेव्हा हे काँग्रेस पक्षाचा अपमान करत नाहीत, ते देशातल्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करत आहेत”, अशा शब्दांत राहुल गांधींनी यावेळी निशाणा साधला.