Rahul Gandhi on Stock Market Crash, Donald Trump & tariff : देशभर सध्या केवळ भारतीय शेअर बाजाराची होत असलेली घसरण आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं आयात शुल्क (टॅरिफ) धोरण चर्चेत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला असून कोट्यवधी भारतीयांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपल्याला सत्याचा सामना करावा लागेल.”
राहुल गांधी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाचा हवाला देत राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की “ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपल्याला वास्तविकतेचा सामना करावा लागेल. या परिस्थितीत पंतप्रधान मोदी आपल्याला कुठेच दिसत नाहीयेत. भारताकडे आपल्या आर्थिक भविष्यासाठी केवळ एक लवचिक व उत्पादन-आधारित अर्थव्यवस्था उभारण्याचा पर्याय आहे, जी सर्व भारतीयांसाठी लाभदायी ठरेल.”
अमेरिकेच्या अध्यक्षांमुळे शेअर बाजार उलथापालथ : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पाटण्यात आयोजित संविधान संरक्षण संमेलनाला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “अमेरिकेच्या अध्यक्षांनी उचललेल्या पावलांमुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारताचा शेअर बाजार हादरवला आहे. भारतातील एक टक्क्याहून कमी लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात. याचाच अर्थ असा की शेअर बाजार सामान्य जनतेसाठी नाही. मात्र, काही लोक इथे मोजता येणार नाहीत इतके पैसे कमावतात. मात्र, सामान्य माणसाला याचा काय फायदा होतो? काहीच नाही.”
गेल्या काही दिवसांत जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर परस्पर आयात शुल्क लागू केलं आहे. त्याचाच शेअर बाजारांवर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ट्रम्प यांनी लागू केलेल्या आयात शुल्कामुळे जागतिक स्तरावर परिणाम दिसत आहेत. याचा भारतावर परिणाम झाला आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सुत्रे हाती घेल्यापासून शुल्कवाढीवर भर दिला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd