गेल्या दोन आठवड्यांपासून मणिपूरमधील घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद दिसून आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत अनेकदा कामकाज थांबवावं लागलं. आज राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं. त्यामुळे दिवसभराचं कामकाज वाया गेलं आहे. यावेळी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांना सभापतींनी खडे बोल सुनावले.
नेमकं काय घडलं?
मणिपूरमधील घटनेवर तब्बल दोन महिन्यांनंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांनी भूमिका मांडली. तसेच, संसदेत न बोलता माध्यमांकडे पंतप्रधानांनी आपली भूमिका व्यक्त केल्यामुळे त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. पंतप्रधानांनी या मुद्द्यांवर सविस्तर निवेदन करावं यासाठी विरोधकांनी चक्क पंतप्रधानांविरोधात लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर खुद्द उपराष्ट्रपती अर्थात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखर यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
“मला आज ४७ नोटिसा आल्या आहेत. या सर्व नोटिसा मणिपूरमधील परिस्थितीवर सदस्यांच्या भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ही परिस्थिती दिसून येत आहेत. मोठ्या संख्येनं सदस्य ४७ व्या नियमाचा वापर करून हाच मुद्दा उपस्थित करत आहेत. मी २० जुलै २०२३ रोजी सभागृहाला सांगितलं आहे की यावर अल्पकालीन चर्चा होईल. केंद्र सरकारनंही या चर्चेची तयारी दाखवली आहे. पण माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की आपल्या या सभागृहातील कृतींमुळे मोठ्या संख्येनं नागरिकांना प्रेरणा मिळायला हवी”, असं म्हणत सभापतींनी विरोधकांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.
“…पण मोदी अजून झोपेत आहेत”, भाजपा नेत्याची संतप्त प्रतिक्रिया; पक्षाचा दिला राजीनामा!
“दररोज जर सभागृहात तीच परिस्थिती निर्माण झाली, तर त्यातून आपल्याबद्दलचा जनतेमधला आदर कमी होईल. माझ्याकडे येणाऱ्या अर्जांमध्ये यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मी या सभागृहाला विनंती करतो की त्यांनी पक्षीय राजकारणातून बाहेर पडून अशा पद्धतीने काम करायला हवं की या मुद्द्यावर अल्पकालीन चर्चा शक्य होऊ शकेल. याच्या परिणामांकडे बघा. प्रश्नोत्तराच्या तासाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासाची चर्चा होऊ द्यावी”, असंही जगदीप धनखर यांनी नमूद केलं.
डेरेक ओब्रायन आक्रमक
दरम्यान, यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी या मुद्द्यावरून आक्रमकपणे भूमिका मांडायला सुरुवात केली. “सभापती जे सांगतायत, ते आम्हाला माहिती आहे. मी नियमानुसारच बोलतोय”, असं म्हणत डेरेक ओब्रायन यांनी जोरात टेबल वाजवला.
“ओब्रायन यांचा पवित्रा पाहून सभापती जगदीप धनखर चांगलेच संतापले. “तुम्ही नीट ऐकलं तर तुम्हाला मी काय सांगतोय ते कळेल. डेरेक ओब्रायन, असा ड्रामा करणं ही तुमची सवयच झाली आहे. तुम्ही प्रत्येक वेळी तेच करता. तुम्हाला वाटतं की हा तुमचा विशेषाधिकार आहे. तुम्ही किमान एक करू शकता, की सभापतीपदाचा थोडा आदर राखा. तुम्ही प्रत्येक वेळी उठून ड्रामा करता. टेबल वाजवू नका. आपण हे सहन करू शकत नाही”, असं म्हणत सभापती जगदीप धनखर यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.