Donald Trump Tariff On India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा धडाका अद्यापही सुरूच आहे. खरं तर ट्रम्प यांच्या टॅरिफची जगभरात चर्चा सुरू आहे. टॅरिफ धोरणांचा अनेक देशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भारतावर देखील ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी जवळपास ५० टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला, या टॅरिफचा परिणाम भारताला देखील सहन करावा लागत आहे. तसेच रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा आणि व्यापार कराराच्या थांबलेल्या वाटाघाटींमुळे भारत आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे.
या घडामोडीनंतर आता एक मोठी माहिती समोर आली आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेतील १९ काँग्रेस खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिलं असून भारताबरोबरचे संबंध त्वरित सुधारावेत’, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे या १९ खासदारांच्या मागणीनंतर ट्रम्प काय भूमिका घेणार? याकडे भारताचं लक्ष लागलेलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या १९ खासदारांनी व्हाईट हाऊसला दिलेल्या पत्राच्या माध्यमातून अमेरिकेचे भारताबरोबर ताणलेले संबंध सुधारण्यासाठी आणि भारतावरील अतिरिक्त कर वाढ मागे घेण्यासाठी पावले उचलण्याची विनंती करण्यात आलेली आहे. यामध्ये खासदार महिला डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांच्या नेतृत्वाखालील १९ सदस्यांनी ८ ऑक्टोबर रोजी हे पत्र व्हाईट हाऊसला दिलं आहे.
या पत्रात म्हटलं आहे की, अलिकडच्या काळात भारतावर करण्यात आलेल्या कर वाढीमुळे भारतीय वस्तूंवरील कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाशी संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम दोन्ही देशांवर नकारात्मक होत आहे. याचा अमेरिकन कंपन्या उत्पादने बाजारात आणण्यासाठी ज्या पुरवठा साखळ्यांवर अवलंबून आहेत त्यांना नुकसान होत असल्याचं या खासदारांनी पत्रात नमूद केलं आहे.
तसेच सदस्यांनी व्यापारी भागीदार म्हणून भारताचे महत्त्व देखील अधोरेखित केलं आहे. अमेरिकन उत्पादक सेमीकंडक्टरपासून आरोग्यसेवा आणि ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये प्रमुख इनपुटसाठी भारतावर अवलंबून आहे. भारतात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना सर्वात वेगाने वाढणाऱ्या ग्राहक बाजारपेठांपैकी एक आहे. या बरोबरच अमेरिकेतील भारतीय गुंतवणुकीमुळे स्थानिक समुदायांसाठी नोकऱ्या आणि आर्थिक संधी निर्माण होत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
व्यापार करारासाठी मोदी, ट्रम्प यांची चर्चा होणार?
भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा होऊ शकते, तसे झाल्यास या चर्चेला गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. द इंडियन एक्स्प्रेसला एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधी अमेरिकेने भारताला सूचित केले आहे. द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू कराव्यात, असे निर्देश मोदी आणि ट्रम्प यांनी आपापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात दिले होते. त्यानंतर वाटाघाटीच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या. मात्र, व्यापार कराराला अंतिम स्वरूप मिळू शकलेले नाही.