Rs 80 paid for every voter deletion application in Aland seat Karnataka assembly election : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोग आणि मतदार याद्या यासंबंधी वेगवेगळे आरोप केले जात आहेत. यादरम्यान कर्नाटकच्या अलंद येथे मतदार यादीमधून नावे वगळण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या विशेष तपास पथक (SIT) महत्त्वाची माहिती दिली आहे. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी अलंद मतदारसंघात निवडणूक आयोगाकडे मतदारांची नावे वगळण्यासाठी बनावट अर्ज करण्यात आले, आणि अशा प्रत्येक बनावट अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला ८० रुपये दिले जात होते, अशी माहिती कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने दिली आहे. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान या मतदारसंघात अशा एकूण ६०१८ अर्ज करण्यात आले होते. म्हणजेच एकूण ४.८ लाख रुपये देण्यात आले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत असलेल्या वोट चोरीच्या आरोपात अलंद येथील मतदार यादीतील घोळाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात या प्रकरणात एसआयटीने भाजपा नेते सुभाष गुत्तेदार यांच्याशी संबंधीत मालमत्तांवर छापे टाकले होते. गुत्तेदार हे २०२३ च्या अलंद निवडणुकीत काँग्रेसचे बी. आर. पाटील यांच्याकडून पराभूत झाले होते.

एसआयटीने या प्रकरणाचा तपास २६ सप्टेंबर रोजी हाती घेतला असून या तपास पथकाने कलबुर्गी जिल्हा मुख्यालयात असलेल्या एका डेटा सेंटरवर लक्ष्य केंद्रीत केले आहे, कारण येथूनच सर्व अर्ज दाखल करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये नावे वगळण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातीला स्थानिक पोलिसांनी आणि सीआयडी सायबर क्राइम यूनिटने केला, ज्यामध्ये मोहम्मद अशफाक नावाच्या एका स्थानिक रहिवाशाचा सहभाग आढळून आला. त्यानंतर तपास एसआयटीने त्यांच्याकडे घेतला.

२०२३ मध्ये अशफाकची चौकशी झाली, पण त्याने निर्दोष असल्याचा दावा केल्यानंतर आणि त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांना देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर तो दुबईला स्थलांतरीत झाला.

आता एसआयटीने इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड आणि आश्फाककडून ताब्यात घेतलेली उपकरणे पाहिल्यानंतर, त्यांना कथितपणे आढळून आले आहे ,की तो इंटरनेट कॉल्सच्या माध्यमातून त्याचे सहकारी मोहम्मद अक्रम तसेच जुनैद, अस्लम आणि नदीम यांच्या संपर्कात होता. गेल्या आठवड्यात एसआयटीने अक्रम, जुनैद आणि नदीम यांच्या मालमत्तांवर छापे टाकले आणि त्यांना कथितपणे कलबुर्गी भागात मतदार यादीमध्ये फेरफार करण्यासाठी चालवले जात असलेल्या एका डेटा सेंटरचे ऑपरेशन आणि दर नाव वगळण्यासाठी ८० रुपये दिल्याची माहिती सिद्ध करणारी सामग्री सापडली आहे.

तपासात कथितरित्या असे आढळून आले आहे की, हे डेटा सेंटर मोहम्मद अक्रम आणि अशफाक यांच्यामार्फत चालवले जात होते, तर इतर लोक डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते. या कारवाईत अर्ज करण्यासाठी वापरलेला एक लॅपटॉप असल्याचेही सांगितले जात आहे.

या गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर, एसआयटीने १७ ऑक्टोबर रोजी भाजपा नेते गुत्तेदार आणि त्यांचा मुलगा हर्षनंदा आणि संतोष आणि त्यांचे सीए मल्लिकार्जुन महांतागोल यांच्या घरी शोध घेतला. एसआयटी अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सातहून अधिक लॅपटॉप, मोबाईल फोन्स तपासणीसाठी ताब्यात घेतले. तपासात असे आढळून आले की, अलंदच्या मतदार यादीत बदल करण्याची विनंती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी ७५ मोबाईल नंबर वापरले गेले होते. हे नंबर पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांपासून ते पोलिसांच्या नातेवाईकांपर्यंत अशा विविध लोकांचे होते.

मतदारांची नावे वगळण्याची विनंती करण्यासाठी डेटा सेंटर ऑपरेटर्सनी बनावट माहिती वापरून निवडणूक आयोगाच्या पोर्टलमध्ये एक्सेस कसा मिळवण्यात आला, याचा अद्याप एसआयटीकडून शोध घेतला जात आहे.